प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा 

0

कोपरगांव : कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित के.जे. सोमय्या (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांचा वाढदिवस आज विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी नाशिक पदवीधर शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कोपरगांव तालुक्याचे भाग्यविधाते आमदार मा. आशुतोष काळे, कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, संस्थेचे सचिव अड संजिव कुलकर्णी तसेच विश्वस्त संदिप रोहमारे हे उपस्थित होते.
शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नावलौकिक मिळविलेल्या के.जे. सोमय्या (वरिष्ठ) महाविद्यालयाचे लाडके प्राचार्य म्हणुन डॉ. बी. एस. यादव सर्वांना परिचित आहे. मागील दहा वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळात महाविद्यालयाला बंगलोर स्थित नॅक संस्थेने दोन वेळा ‘अ’ श्रेणी देऊन गौरवान्वित केलेले असून विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या गेलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयाला ‘उत्कृष्ट महाविद्यालय’ म्हणुन पुरस्कृत केलेले आहे. शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांना जीवन-गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आज के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव, जवळके व चास या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीने परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच के.जे. सोमय्या (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले. तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. या सत्रात प्रोफेसर (डॉ) सुभाष पाटणकर यांनी स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर बोलतांना मनाची एकाग्रता व यशस्वीतेचा मूलमंत्र यावर सखोल मार्गदर्शन केले. वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांच्या वतीने प्राचार्यांना शाल, बुके व भेटवस्तु देऊन आरोग्यमय जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. वसतीगृहातील मुलींसाठी वसतीगृह प्रमुख प्रा. सौ. साधना वाकचौरे यांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले. यावेळी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे यांच्याकडून वसतीगृहातील मुलींसाठी फळांचे वाटपही करण्यात आले. 
प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आज कोपरगाव तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी समक्ष भेटून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here