कोळपेवाडी वार्ताहर – प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व नवक्रांती महिला अकॅडमी तसेच आ. आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रविवार (दि.०९) रोजी महिलांसाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव मतदारसंघातील बचत गटाच्या महिलांचा आर्थिक आधारस्तंभ म्हणून प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आपली जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडीत आहे. महिलांना केवळ घरकाम आणि मातृत्व यापुरतेच मर्यादित ठेवणे योग्य नाही, महिला विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करू शकतात, नेतृत्व करू शकतात, आणि समाजात बदल घडवू शकतात याची जाणीव ठेवून प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून महिला भगिनींसाठी सातत्याने विविध अभिनव उपक्रम राबवीत आहे. यामध्ये बचत गटांच्या महिलांना आर्थिक द्रुष्ट्या सक्षम करण्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणारा गोदाकाठ महोत्सव, तसेच स्त्री शक्तीचा जागर आणि गौरव करण्यासाठी शारदीय नवरात्र उत्सव, दिवाळी हाट, विविध घरगुती व्यवसायांचे प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबविले जात आहे.
त्याप्रमाणेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रविवार (दि.०९) रोजी कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत महिलांचा आवडीचा दागिना असलेल्या नथीचे महिला व मुलींसाठी मोफत प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे. सौ.नीलम गावित्रे या महिलांना याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्रात मोत्याची नथ ही स्त्रियांचे सौभाग्यचिन्ह मानले जाते त्यामुळे विवाह सोहळा तसेच विविध धार्मिक कार्यक्रम प्रसंगी महिलांना नथ वापरण्याची मोठी हौस असते. नथीच्या अनेक डिझाईन्स असून या डिझाईन प्रशिक्षण घेवून महिला सहजपणे या नथी तयार करू शकतात त्यासाठी महिला व मुलींसाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी सांगितले आहे. तसेच ‘चला देश घडवूया बालविवाह थांबवूया’ या सामाजिक विषयावर सामजिक कार्यकर्ते तथा शिर्डीच्या साईनाथ रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक गावित्रे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यां प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे,जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी केले आहे.