परिसरात भीतीचे वातावरण; वनविभागाकडून पंचनामा
पोहेगांव (प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील 27 चारी फटांगरे वस्तीवर बाबासाहेब राधाजी फटांगरे यांच्या अंगणात असलेल्या कालवडीवर बिबट्याने हल्ला केला. दोरखंडाने बांधलेली कालवड बिबट्याने दाताच्या साह्याने दोरखंड तोडून तिला फस्त केले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने देखील तात्काळ या घटनेची दखल घेत फटांगरे वस्तीवर मृत झालेल्या कालवडीचा पंचनामा केला आहे.
गुरुवारी रात्री फटांगरे वस्तीवर या बिबट्याने कालडीवर हल्ला केला. रात्री घरात झोपलेले असताना बिबट्याने बाहेर कालवड ओढत नेली असल्याचे देखील लक्षात आले नाही. सकाळी उठल्यानंतर बाबासाहेब फटांगरे यांच्या लक्षात आले की कालवडीची वन्य प्राण्याने शिकार केली. त्यांनी शिकार केलेल्या जागी माग पाहिले असता ते बिबट्याचे आढळून आले. मग मात्र त्यांची पक्की खात्री झाली की ही शिकार बिबट्यानेच केली. परिसरातील आजूबाजूचे ग्रामस्थ वस्तीवर आल्यानंतर त्यांनी ओढत नेलेली कालवडीची जागा शोधून काढली. शेजारीच गिन्नी गवतात या बिबट्याने तिला अर्धे फस्त केले होते.
सदर घटनेची माहिती बाबासाहेब फटांगरे यांनी पोलीस पाटील दगू गुडघे यांना दिली. वन विभागाशी संपर्क साधा घडलेला प्रकार सांगितला तेव्हा वन वभागाने तात्काळ याची दखल घेत वनविभागाच्या अधिकारी शारदा मेहेरखाम घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी मृत झालेल्या कालवडीचा पंचनामा केला. मात्र या बिबट्याचा बंदोबस्त होणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांनी त्यांना सांगितले.
सोनेवाडी पंचक्रोशी मध्ये सध्या बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या बिबट्याने परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्या, कोंबडे, बोकड व कालवडी फस्त केल्या आहेत. रात्रीच्या वेळी तर या बिबट्याच्या धास्तीने शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाणे देखील कठीण झाले आहे. तेव्हा वन विभागाने या परिसरात तात्काळ पिंजरा लावावा अशी मागणी करण्यात आली.