ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचं निधन झालं आहे. ते 82 वर्षांचे होते.
त्यांच्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 1281 गोल केले. त्यांनी ब्राझीलसाठी 92 सामने खेळले. त्यात त्यांनी 77 गोल कले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 1958,1962 आणि 1970 असं तीनदा वर्ल्ड कप जिंकला. त्यांना 2000 साली प्लेयर ऑफ सेंच्युरी हा खिताब देण्यात आला.
गेल्या काही वर्षांपासून त्यांना किडनी आणि प्रोस्टेट ग्रंथींचा आजार होता. त्यांच्या मुलीने पेले यांच्या निधनाची माहिती दिली, “आम्ही जे काही आहोत ते तुमच्यामुळे आहोत, आमचं तुमच्यावर अतिशय जास्त प्रेम आहे.” पेले यांनी त्यांच्या कारकीर्दीत संपूर्ण फुटबॉल विश्वावर अधिराज्य गाजवलं होतं. पेले यांनी फुटबॉलमधून 1977 साली निवृत्ती घेतली होती. पण आजही त्यांच्या अविस्मरणीय खेळींची चर्चा फुटबॉल चाहत्यांमध्ये होताना दिसते.
पेले 3 फुटबॉल विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचे प्रतिनिधी राहिले आहेत. अशी कामगिरी करणारे ते जगातील एकमेव खेळाडू आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 1363 सामने खेळले. पेले यांच्या नावावर तब्बल 1281 गोल करण्याचा विक्रम आहे.
पेले यांच्या खेळाबाबत आणि त्यांच्या विक्रमांबाबत शेकडो किस्से जगभरात सांगितले जातात. पण त्यांच्या जीवनाबाबत अशा काही गोष्टीसुद्धा आहेत, त्या लोकांना फारशा माहीत नाहीत.