संगमनेर : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आता रंगत आली असून शुक्रवारी मतदान होत आहे. महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवीत असल्याने मोठी ताकद निर्माण झाली असून शिवसेनेमुळे नवचैतन्याचे वातावरण पसरले आहे. या निवडणुकीत शिवसेना, महाविकास आघाडीला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणार असल्याची माहिती शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय फड यांनी दिली.
संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडी आ.बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तीन पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात आहे. पहिंल्यादाच अशा पध्दतीने सामुहिक प्रचार केला जात आहे. शिवसेना ग्रामीण भागात तळागाळा पर्यंत पोहचली आहे. गावागावात शिवसैनिक नागरिक मतदारांचे प्रश्न समजावून ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसैनिकांना काम करण्याची संधी मिळाली आहे. शुक्रवारी २८ तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकीत शिवसैनिक झोकून देऊन काम करत आहे. बाजार समितीत महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. या निवडणुकीत शिवसेना आपली जबाबदारी पाडणार असून महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
तालुक्यातील मतदारांशी संवाद साधला असता शिवसेना आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर करत आहे. शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते जीव ओतून प्रचारात सहभागी झाले आहेत. एक सामुहिक शक्ती निर्माण करण्यात यश आले आहे. तीन पक्ष एकमेकांशी विचार विनिमय करून रणनिती ठरवतात. विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरी सुज्ञ मतदार महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.शनिवारी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. विजयाचा गुलाल तिन्ही एकत्रित पक्ष उधळणार आहे. शिवसेना या निवडणुकीत मोठी उभारी घेणार असून यामुळे शिवसैनिकात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे संजय फड यांनी सांगितले.