संगमनेर : शेतकऱ्यांच्या शेतात धुमाकूळ घालणारे बिबटे आता वर्दळ असणाऱ्या मानवी वस्तीकडे चाल करू लागले आहेत. शनिवारी संगमनेर शहराजवळील गुंजाळवाडी परिसरातील देशमुख नगर मध्ये बिबट्याने घराच्या पोर्च मध्ये खेळत असलेल्या चार वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला करत आपल्या जबड्यात पकडले, यावेळी या चिमुकल्याच्या आईने ही घटना पाहिल्यावर तिने बिबट्याच्या पाठीमागे पळत चिमुकल्याचा जीव वाचवला. या घटनेत चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
संगमनेर तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या पशुधनाबरोबरच आता बिबटे माणसांवर हल्ले करू लागले आहेत. यापूर्वी बिबट्यांच्या हल्ल्यात तालुक्यातील अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेकांना बिबट्यांनी रक्त भंबाळ केले आहे. शनिवारी शहरा जवळील गुंजाळवाडी परिसरातील देशमुख नगर मध्ये राहणाऱ्या संभाजी पवार यांच्या घराच्या पोर्च मध्ये चार वर्षे वयाचा शिवम खेळत होता. यावेळी सिमेंट पोल फॅक्टरी जवळील कृष्णाई बिल्डिंगच्या पाठीमागील भागात असणाऱ्या वेड्या बाभळीच्या झाडातून बिबट्याने खेळत असणाऱ्या शिवम वर अचानक हल्ला चढवला आणि काही कळण्याच्या आत चिमुकल्या शिवमची मान बिबट्याने त्याच्या जबड्यात पकडून समोरच्या मोकळ्या मैदानात धूम ठोकली. यावेळी शिवमची आजी आणि चुलतीच्या निदर्शनास ही बाब आल्यावर त्यांनी मोठ्याने आरडाओरडा केला, त्याचवेळी शिवमची आई आपल्या चिमुकल्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी सरसावली, तिने जीवावर उदार होत बिबट्याच्या तावडीतून पोटच्या गोळ्याला सोडवले. मात्र या हल्ल्यात या चिमुकल्याच्या हनुवटी जवळ व छातीला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या. त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्याला घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले, जखमी चिमुकल्याला सात ते आठ टाके पडले आहेत. दरम्यान या घटनेने गुंजाळवाडी आणि परिसरात दहशत निर्माण झाली आहे.