देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे
राहुरी तालुक्यातील कुरणवाडी शिवारात काल गुरुवारी दि.२० रोजी पहाटे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला. परंतु ग्रामस्थ व वन खात्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये दुसरा पिंजरा लावण्या बाबत वाद सुरु असतानाच अचानक पिंजऱ्याबाहेर तीन बिबटे आले. त्यांनी पिंजऱ्याच्या दरवाजाला धडका देवून पिंजऱ्याचा लाॅक वाकवून पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला पळून नेले. अडकलेला बिबट्या पिंजऱ्यातून पळून गेल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत.
कुरणवाडी ता.राहुरी शिवारात वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात आज गुरुवारी पहाटे एक ते दोन वाजता एक बिबट्या अडकला. परंतु अडकलेल्या बिबट्याच्या पिंजऱ्याबाहेर आणखी तीन-चार बिबटे घिरट्या घालत असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी पाहिले. हि माहिती समजताच भल्या पहाटे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ,वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. ते निघून गेले.
वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याचा पिंजरा हलविण्याची हालचाल केली. परंतु ग्रामस्थांनी त्यास विरोध केला. पिंजऱ्याच्या भोवती फिरणाऱ्या इतर बिबट्यांना पकडण्यासाठी तात्काळ आणखी पिंजरे घटनास्थळी लावावेत. अशी मागणी करुन त्यानंतर बिबट्याचा पिंजरा हलवावा, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. त्यामुळे ग्रामस्थ आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाले.
काही वेळात अडकलेल्या बिबट्याच्या पिंजऱ्याबाहेर तीन बिबटे आले. त्यांनी पिंजऱ्याच्या दरवाजाला धडका दिल्या. पिंजऱ्याचा लाॅक वाकवून अडकलेल्या बिबट्याची सुटका करुन बिबट्यास पळून नेले. पिंजरा पुन्हा मोकळा झाला. ग्रामस्थ व वन खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या वादावर पडदा पडला.परंतु त्या तिन बिबट्यासह पिंजऱ्यातून पळालेल्या बिबट्यामुळे शेतकरी वर्ग भयभित झाला आहे. दरम्यान, कुरणवाडी शिवाराच्या शेजारच्या वडनेर येथे दहा दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा बळी गेला होता. कुरणवाडी येथे चार बिबट्यांचा काफिला मुक्त संचार करीत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत.