पोहेगांव (प्रतिनिधी ) : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून वन विभागाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे साधी चौकशी देखील वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून होत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे.काल सोमवारी दीड वाजेच्या सुमारास जायपत्रे वस्ती येथील भीमराज किसन जायपत्रे यांच्या वस्तीवर बिबट्याने हल्ला चढवत शेळी फस्त केली.
या बिबट्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. रात्री शेतात जाणे मुश्किल झाले आहे. जायपत्रे वस्ती ,घोंगडे वस्ती, साबळे वस्ती परिसरात पाचवी घटना असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतच्या लेटर पॅड वर देखील पत्र दिलेले आहे. दीपक घोंगडे, भीमराज जायपत्रे यांनी गेल्या आठवड्यातच वन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या परिसरात बिबट्या धुमाकूळ घालत असून आपण तात्काळ पिंजरा लावा अशी मागणी केली होती मात्र वन विभागाने याकडे दुर्लक्ष केले त्यामुळेच काल जायपत्रे वस्ती परिसरातील भीमराज जायपत्रे यांची शेळीची या वाघाने शिकार केली . गोठ्यात बांधील असलेली शेळी या वाघाने दाव्यासह ओढत रानात नेत तिला फस्त केले.
आपल्या डोळ्यासमोर शेळी जात असल्याचे लक्षात आले असताना देखील या बिबट्याच्या पुढे जायपत्रे कुटुंब हतबल झाले. त्यांनी आजूबाजूच्या वस्तीवर आवाज देत आपल्या सोबतीला शेजारीपाजारी बोलून घेतले. रात्र जागून काढत सकाळी पोलीस पाटील दगू गुडघे यांना याबाबत कल्पना दिली. जर या परिसरात पिंजरा लावला नाही तर उद्या हा बिबट्या नागरिकांवरही हल्ला करू शकतो अशी भीती भीमराज जायपत्रे यांनी व्यक्त केली.