श्रमिक मजूर संघाच्या लढ्याला यश
कोपरगाव प्रतिनिधी :- प्रधानमंत्री शक्ती पोषण आहार योजनेअंतर्गत काम करणारे कर्मचारी हे अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करत आहे. या कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये महिना इतकेच मानधन मिळते. दररोज तीन ते चार प्रकारचा मेनु तयार करून विद्यार्थ्यांना द्यावा लागतो. परंतु या कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. या कर्मचाऱ्यांसाठी कार्य करणारी सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेने बेमुदत खिचडी बंद ठेवण्याचा इशारा देताच तीन महिन्याचे रखडलेले मानधन जमा झाल्याची संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते यांनी दिली आहे .
याबाबत अधिक माहिती देताना विधाते म्हणाले की खिचडी बनविणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मागणी करूनही गेल्या तीन महिन्यापासून मानधन मिळालेले म्हणून 26 जानेवारी 2025 पर्यंत मानधन न मिळाल्यास 27 जानेवारी 2025 पासून बेमुदत खिचडी बंद ठेवण्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, शालेय पोषण आहार राज्य संचालक पुणे आणि शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांना दिला होता.
काल संघटनेच्या शिष्टमंडळाने विधान भवनात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे ओ एस डी यांच्यासोबत आणि शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांची मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. प्रधान सचिवांनी तात्काळ मानधन जमा करायचे आदेश दिल्याने आज राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थकीत तीन महिन्यांचे मानधन जमा झाले आहे.त्याबद्दल संघटनेच्या वतीने शासनाचे आभार व्यक्त केले आहे. शिष्टमंडळात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते, राज्य समन्वयक सुभाष सोनवणे, राज्य समन्वय कैलास पवार, राज्य समन्वय उत्तम गायकवाड, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाबासाहेब गोरडे, नेवासा तालुका संघटक दत्तात्रय गोरे,दादासाहेब अनभुले आणि सहसचिव तांबोळी यांचा समावेश होता. सर्वत्र कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.