देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या भरमसाठ रासायनीक खते तसेच औषधांमुळे पाणी, जमीन तसेच हवा या नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास होत आहे. पर्यायाने हवामानातील बदलाचा परिणाम शेतीवर होत आहे. त्यामुळे भविष्यात अन्न सुरक्षेचा प्रश्न येऊ शकतो. अन्न सुरक्षेसाठी व पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेल उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
भारतीय एकात्मिक शेती संस्था, मोदीपुरम व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प यांचे संयुक्त विद्यमाने एकात्मिक शेती या विषयावरील द्विवार्षिक कार्यशाळेचे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे दि. 18 ते 21 जानेवारी, 2023 या कालावधीमध्ये करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. याप्रसंगी या कार्यक्रमासाठी कृषि विद्या, कृषि वानिकी आणि वातावरण बदलाचे नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ. एस. भास्कर हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर मोदीपूरम येथील भारतीय शेती पध्दती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ए.एस. पनवार, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, कृषि विद्या विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके, मोदीपूरम येथील प्रकल्प समन्वयक डॉ. रवी शंकर व एकात्मिक शेती पध्दतीचे प्रमुख कृषि विद्यावेत्ता डॉ. उल्हास सुर्वे उपस्थित होते.
कुलगुरु डॉ. पाटील पुढे म्हणाले की विद्यापीठाने विकसीत केलेले आय.ओ.टी., सेंन्सर तसेच ड्रोन हे तंत्रज्ञान जर एकात्मिक शेती पध्दतीच्या मॉडेलमध्ये वापरले तर अल्पभुधारक तसेच मध्यम शेतकरीसुध्दा शाश्वत उत्पन्न मिळवू शकेल. तसेच यामध्ये विपणन व्यवस्थेचा अंतर्भाव करावा. यावेळी डॉ. भास्कर आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की संयुक्त राष्ट्राने प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेल शेतकर्यांसाठी शाश्वत आधार ठरु शकतील असे म्हटले आहे. एकात्मिक शेती पध्दतीच्या विविध मॉडेल्समधुन आपल्याला फक्त कार्बोहायड्रेट्स व उर्जा मिळणार नसून पोषण सुरक्षा देणारे ठरणार आहे. रसायनविरहित शेती व पर्यावरणाची सुरक्षा एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेल आत्मसात केले तरच होऊ शकेल. भारतातील 10 हजार शेतकरी उत्पादक कंपन्यांपैकी जवळ जवळ पाचशे शेतकरी उत्पादक कंपन्या ह्या नैसर्गिक शेती हा मुख्य घटक स्वीकारुन काम करीत आहे. हे खुप आशादायक चित्र असल्याचे ते यावेळी म्हणाले.
यावेळी डॉ. पनवार यांनी भारतातील एकात्मिक शेती पध्दतीच्या विविध केंद्रांच्या संशोधनाचा आढावा सादर केला. डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी एकात्मिक शेती पध्दती ही बर्याच प्रश्नांवरील मार्ग असल्याचे सांगितले. डॉ. आनंद सोळंके यांनी एकात्मिक शेती पध्दती प्रकल्पाचा आढावा सादर केला. याप्रसंगी कृषि विद्या विभागातील आचार्य पदवीचा विद्यार्थी काशिनाथ तेली याचा कृषि वैज्ञानीक परिक्षेतील यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विविध प्रकाशनांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.