भारतीय बनावटीच्या औषधामुळे उझबेकिस्तानमधील 18 मुलांचा मृत्यू?

0

भारतीय औषध निर्माती कंपनी मेरियन बायोटेकचं कफ सिरप सेवन केल्याने 18 मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

गांबिया पाठोपाठ आता उझबेकिस्तानमध्ये ही असा प्रकार घडल्याने खळबळ माजली आहे. या कफ सिरपमध्ये इथिलीन ग्लायकोल हा विषारी पदार्थ आढळून आल्याचं, उझबेकिस्तान सरकारने आपल्या निवेदनात म्हटलंय.  तसेच Dok-1 Max हे औषध मुलांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय देण्यात आलं असून या औषधाचा डोस मुलांसाठी प्रमाणित डोसपेक्षा जास्त असल्याचंही सरकारने या निवेदनात म्हटलंय.  मागच्या काही महिन्यांपूर्वी असंच एक प्रकरण समोर आलं होतं.

गांबियामधील लहान मुलांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा ठपका भारतातील औषध कंपनीवर ठेवल्यानंतर आता उझबेकिस्ताननेही 18 मुलांच्या मृत्यू प्रकरणी भारतीय कफ सिरप कंपनीला जबाबदार धरलंय. 

दरम्यान सगळ्या प्रकरणात भारताच्या आरोग्य मंत्रालयाकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलंय. यात म्हटलंय की, “आम्ही या प्रकरणाची दखल घेतली असून, भारताची केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना 27 डिसेंबर 2022 पासून उझबेकिस्तानच्या राष्ट्रीय औषध नियामकाशी संपर्कात आहे.” तसेच, उत्तर प्रदेशच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी या औषधाची निर्मिती करणाऱ्या मेरियन बायोटेकच्या परिसराची तपासणी केली.

कंपनीतून औषधाचे नमुने घेतले असून पुढील चाचणीसाठी हे नमुने चंदीगडच्या प्रादेशिक औषध चाचणी प्रयोगशाळेत पाठवले असल्याचं निवेदनात म्हटलंय.  या सगळ्या घटनेवर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी बीबीसीने मेरियन बायोटेकशी संपर्क साधला. मात्र त्यांच्याकडून अद्यापही कोणता प्रतिसाद आलेला नाही. 

एएनआय या वृत्तसंस्थेने मेरियन बायोटेकच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटलंय की, कंपनीने तात्पुरत्या स्वरूपात या सिरपचं उत्पादन थांबवलं असून सध्या चौकशी सुरु आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर कंपनी पुढची कारवाई करेल. 

दिल्लीजवळील नोएडा स्थित मेरियन बायोटेक या कंपनीची स्थापना 1999 मध्ये झाल्याचं कंपनीच्या लिंक्डईन प्रोफाईलवर म्हटलंय. या कंपनीची वेबसाईट सध्या बंद आहे. या कंपनीची उत्पादने मध्य आशियाई देश, मध्य आणि लॅटिन अमेरिका, दक्षिण पूर्व आशिया आणि आफ्रिकेत निर्यात केली जातात.  भारत जगातील एक तृतीयांश औषधांचं उत्पादन करतो, बहुतेक औषधं ही जेनेरिक स्वरूपातील असतात. भारतात फार्मास्युटिकल कंपन्यांची संख्या वाढताना दिसते आहे.

27 डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनात उझबेकिस्तान सरकारने म्हटलंय की, 2012 पासून देशात Dok-1 Max गोळ्या आणि सिरप विकले जात आहेत.

तपासात असं आढळून आलंय की, मृत्यू झालेल्या मुलांनी 2 ते 7 दिवस सतत 3 ते 4 वेळा कफ सिरपचं सेवन केलं होतं. त्याचं प्रमाण 2.5 ते 5 मिलीच्या दरम्यान होतं. हे प्रमाण मुलांसाठी प्रमाणित डोसपेक्षा जास्त असल्याचं मंत्रालयाने म्हटलंय. 

मुलांचा मृत्यू नेमका कोणत्या कालावधीत झाला हे निवेदनात स्पष्ट केलेलं नाही.

यात असं म्हटलं होतं की, उझबेकिस्तान मधील आरोग्य अधिकारी ‘मागील दोन महिन्यांत भारतात बनवलेलं कफ सिरप घेतल्याने मध्य समरकंद प्रदेशातील 15 मुलांचा मृत्यू झाल्याच्या दाव्याची’ चौकशी करत आहेत. 

26 डिसेंबर रोजी Podrobno.uz या न्यूज बेबसाइटने एक बातमी दिली होती. यात म्हटलंय की, सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत उझबेकिस्तान मधील 21 मुलांना उपचारादरम्यान भारतात तयार केलेलं Dok-1 Max कफ सिरप देण्यात आलं होतं. या 21 मुलांपैकी 15 मुलं तीन वर्षांखालील होती. या औषधामुळे या मुलांची मूत्रपिंडं निकामी झाली तर केवळ तीन रुग्ण बरे झाले. मंत्रालयाने आपल्या निवेदनात नमूद केलंय की, प्राथमिक प्रयोगशाळेच्या तपासात कफ सिरपमध्ये इथिलीन ग्लायकोल आढळून आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here