मुंबई, दि. 10 : आपल्या कलेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे काम वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकार करत असतात. आगामी काळात महाराष्ट्र आर्थिक क्षेत्राबरोबर सांस्कृतिक क्षेत्रातही आघाडीवर कसा राहील यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत नाट्यगृहे मराठी नाटकांसाठी अल्प दरात उपलब्ध करुन देण्यात येतील, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणारे राज्य सांस्कृतिक पुरस्कार सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथील कलांगण येथे प्रदान करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपिस्थत होते. सांस्कृतिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या कलावंतांना आज सांस्कृतिक राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरुप 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे.
मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, राज्यभरात सध्या ८३ नाट्यगृहे असून २२ नाट्यगृहे स्थानिक स्वराज्य संस्थेकडे येतात. उर्वरित ५२ नाट्यगृहांचे नूतनीकरण यासह राज्य शासनाच्या रवींद्र नाट्य मंदिराचे नूतनीकरण याला प्राधान्य देण्यात येणार आहे. लवकरच सांस्कृतिक कार्य विभागामार्फत एक पोर्टल विकसित करण्यात येणार आहे. या पोर्टलवर कलाकारांची माहिती उपलब्ध होणार आहे.
सांस्कृतिक पुरस्कार प्रदान समारंभावेळी ‘उत्सव महासंस्कृती’चा हा नृत्य, नाट्य, भक्ती, संगीत आणि रंजन करणाऱ्या कलांचे सादरीकरण असणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. श्रीधर फडके, सावनी रवींद्र, भजनसम्राट ओमप्रकाश, कृष्णा मुसळे, कार्तिकी गायकवाड, संपदा माने, संदेश उमप, संपदा दाते, संतोष साळुंखे, संघपाल तायडे, शिल्पी सैनी या कलाकरांनी सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले होते.