देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
आपल्या जीवनाला आकार देण्याचे काम आपली मातृभाषा करत असते.मराठी ही आपली मातृभाषा असून मराठी भाषेबद्दल आपणाला अभिमान असायला हवा. तिचे संवर्धन होण्यासाठी, ती अधिकाधिक सशक्त होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत असे प्रतिपादन इंदोर येथील कृषि महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. उदय खंडकर यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या पदव्युत्तर महाविद्यालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी डॉ. उदय खंडकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बापूसाहेब भाकरे होते. यावेळी कुलसचिव प्रमोद लहाळे उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. बापूसाहेब भाकरे म्हणाले की मराठी भाषेची महती संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वरांपासून सुरू झाली. मराठी भाषा आपल्या महाराष्ट्राची शान असून आपण सर्वांनी मराठीमधेच बोललं पाहिजे. तिचा आनंद वाढवण्यासाठी लिखाण, वाचन, कविता तसेच पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे. तसेच ती आणखी समृद्ध कशी होईल हे सर्वांनी पाहिले पाहिजे. बाहेरच्या राज्यांमध्ये कोणी मराठी बोलणारा दिसला तर आपल्याला त्या मराठी भाषेमुळे त्या व्यक्तीविषयी आपुलकी वाटते, इतके सामर्थ्य या मराठी भाषेचे असून आपण आपली बांधिलकी मराठीशी जास्तीत जास्त कशी राहील हे पाहणे गरजेचे आहे. यावेळी श्री. प्रमोद लहाळे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की आपली सुरुवातीची पिढी टीव्हीने संपवली. आताची पिढी मोबाईल संपवत असून मराठीचे वाचन कमी झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्रजी भाषा महत्त्वाची असली तरी मराठी भाषेचा जागर होणं हे सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहे असे ते यावेळी म्हणाले. यावेळी सोनाली घोगरे या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ. मनोहर धादवड यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व हाळगाव कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सुनील भणगे, डॉ. ज्ञानदेव फराटे, राजू राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.