मुंबई : “मला त्यांच्यापेक्षा खालची भाषा बोलता येते. मी नागपूरचा आहे”, असं प्रत्युत्तर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना फडतूस, लाचार आणि लाळघोटा म्हटलं आहे.
“अडीच वर्षांचा कारभार बघितल्यानंतर नेमकं फडतूस कोणय? हे महाराष्ट्राला माहिती आहे. दोन-दोन मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर राजीनामा घेऊ शकले नाहीत. त्यांच्याभोवतीच लाळ घोटत असतात.
जे वाझेच्या मागे लाळ घोटतात, ज्यांच्या काळात पोलीस एक्स्टॉर्शन करतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय,” असा सवाल फडणवीस यांनी केला.
“अडीच वर्षे घरात बसून राजकारण करणाऱ्यांनी आम्हांला शिकवू नये. ज्या दिवशी बोलणं सुरु करील त्या दिवशी त्यांची पळता भूई थोडी होईल. त्यांचा जो थयथयाट आहे त्याला उत्तर देण्याचं कारण नाही.
मोदींचे फोटो घेऊन निवडून येता आणि खुर्चीसाठी लाळ घोटता… मग खरा फडतूस कोण?
मी गृहमंत्री असल्याने अनेकांना अडचणी येताय. ते पाण्यात देव ठेवून बसले आहेत. पण मी गृहमंत्रिपद सोडणार नाही. जो-जो चुकीचं काम करेल त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही”, असं फडणवीस म्हणाले.
फेसबुकवरील पोस्टवरुन उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे आणि एकनाथ शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्या यांच्यात वाद झाला होता.
ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे या सोमवारी संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतण्याच्या तयारीत होत्या. त्यावेळी ऑफिसच्या आवारात शिरुन शिवसेनेच्या शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.