महावितरणने मागण्या मान्य केल्याने शिवसेनेचा दंडुका मोर्चा व हल्लाबोल आंदोलन स्थगित 

ग्राहकांची वीज आता खंडित होणार नाही

0

संगमनेर : संगमनेर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महावितरण विरोधातील हल्लाबोल आंदोलन व दंडुका मोर्चाच्या इशाऱ्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नमते घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांनी शहर प्रमुख अमर कतारी यांना लेखी पत्र दिल्याने सेनेने आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली. त्यामुळे वीज बिलाची तक्रार असलेल्या वीज ग्राहकांची वीज आता खंडित होणार नाही.

           शहर व तालुक्यात विजेच्या समस्या, चुकीचे वीज बिल, नादुरुस्त मीटर, चुकीच्या पद्धतीने बिलाची आकारणी, तक्रारदारांना पोहोच न देणे, कर्मचारी व अधिकाऱ्यांची नागरिकांशी अरेरावीची भाषा, या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे  शहर प्रमुख अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली २२ डिसेंबरला महावितरण कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन व दांडूके मोर्चाचे आयोजन केले होते. तसे निवेदनही महावितरण कार्यालयाला देण्यात आले होते. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमुळे आंदोलनाला प्रशासनाने उशिरा परवानगी दिली. तरीही सेनेचे पदाधिकारी आंदोलनावर ठाम राहून त्यांनी आंदोलनात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी धास्ती घेतली होती. कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले. मीटर वाचन प्रमाणे अचूक बिल दिले जातील. एक वर्षाची सरासरी पाहून विज बिल आकारणी केली जाईल. उंचावरील मीटर व घरामधील मीटर बाहेर बसवले जातील. विज बिल दुरुस्त होईपर्यंत कोणाचाही वीज पुरवठा खंडित होणार नाही. अधिकारी व कर्मचारी ग्राहकांशी सौजन्याने वागतील. गैरसोय टाळण्यासाठी ग्राहक तक्रार कक्ष निर्माण करून जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. नादुरुस्त मीटर बदलणे मोहीम मीटर उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने राबविण्यात येईल. तात्कालीन तक्रारी त्वरित सोडवण्यात येतील. उपाययोजना तातडीने करून ग्राहक सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केला जातील, असे लेखी आश्वासन बुधवारी अभियंता थोरात यांनी दिल्याने सेनेने आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली.जिल्हाप्रमुख मुजीब शेख, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे, शहरप्रमुख अमर कतारी,  शहर कार्याध्यक्ष दीपक साळुंके यांनी महत्वपूर्ण सूचना मांडल्या. उपशहर प्रमुख दीपक वनम, इम्तियाज शेख, वेणुगोपाल लाहोटी, महिला आघाडीच्या शितल हासे, संगीता गायकवाड, अशा केदारी, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, अमोल डुकरे, सचिन साळवे, सुनील रूपवते, गोविंद नागरे, त्रीलोक कतारी यावेळी उपस्थित होते.   

तीन दिवसासाठी ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरू करणार – कतारी 

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांचा पाठपुरावा करण्यासाठी २०, २१ व २२ डिसेंबर असे तीन दिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालय व बस स्थानक परिसरात मंडप टाकून ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरू करणार आहे. आलेल्या तक्रारींचा त्वरित निपटारा केला जाणार आहे. वीज खंडित झाल्यास त्याची माहिती त्वरित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना द्यावी, असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांनी केले आहे.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here