कोपरगाव प्रतिनिधी -: “मराठी भाषेने देशाचे नेतृत्व केलेले आहे. संस्कृत, प्राकृत या भाषांबरोबरच मराठी भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. हा दर्जा मिळवण्यासाठी व मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी संताचे साहित्य, फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारसरणी, ग्रामीण साहित्यिकांचे साहित्य क्षेत्रातील योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.” असे प्रतिपादन सक्षम समीक्षा त्रैमासिकाचे संपादक डॉ. शैलेश त्रिभुवन यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव महाविद्यालयात “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा”या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. त्यांनी आपल्या मनोगतात, “विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक क्षमतेचे व्यासपीठ म्हणून महाविद्यालयाकडे बघितले जाते. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी कथाकथन,वादविवाद स्पर्धा,वक्तृत्त्व स्पर्धा,काव्यवाचन आदी स्पर्धेत भाग घेवून आपले व्यक्तिमत्त्व घडवावे.” असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. माधव सरोदे यांनी, “लेखक कसा घडतो, संपादक कसा घडतो, हे सांगताना वैयक्तिक महाविद्यालयीन जीवनाचे उदाहरण देताना ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे हे विज्ञान शाखेचे प्राध्यापक असून सुद्धा त्यांनी मराठी साहित्यात सक्षमपणे साहित्य निर्मिती केलेली आहे. त्याचबरोबर पंडित विद्यासागर, प्रा. संजय ढोले यांसारखे विज्ञान शाखेचे प्राध्यापक आज सक्षमपणे मराठी साहित्य लिहीत आहे, त्यामुळे मराठी भाषेची समृद्धता नव्याने वाढीस लागत आहे. ही समृद्धता बळकट करण्यासाठी नवीन पिढीतील वाचकांनी मराठी साहित्यातील कथा, कविता, नाटक, कादंबरी यांसारखे साहित्यप्रकार वाचणे आवश्यक आहे” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. बाबासाहेब शेंडगे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी मा.सौ. सुनिता त्रिभुवन, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. मोहन सांगळे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ.अर्जुन भागवत, प्रा.डॉ.देविदास रणधीर, प्रा.डॉ. बंडेराव तऱ्हाळ, प्रा. डॉ. वैशाली सुपेकर यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच डॉ.बाळू वाघमोडे, डॉ. प्रमोद चव्हाण, डॉ. भागवत देवकाते, प्रा. सुनील काकडे, डॉ.योगिता भिलोरे, प्रा. सुरज हुसळे, प्रा.अश्विनी पाटोळे इ.सह अनेक प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रावसाहेब दहे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा.डॉ. उज्ज्वला भोर मानले.