माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांचे काँग्रेस मधून निलंबन

0

संगमनेर : बहुचर्चित नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारी आणि ए बी फॉर्म देऊन देखील आपला अर्ज दाखल न करणाऱ्या माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांचे अखेर रविवारी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईपर्यंत काँग्रेस पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. तसा आदेश पक्षाच्या शिस्तभंग समितीचे सचिव तारीक अन्वर यांनी रविवारी उशिरा काढला.

          नाशिक पदवीधर मतदार संघासाठी येत्या ३० जानेवारी रोजी निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने या मतदार संघाचे गेली तेरा वर्ष नेतृत्व करत असणारे आमदार डॉ.सुधीर तांबे यांना उमेदवारी देऊन एबी फॉर्म देखील दिला होता. मात्र अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी पक्षाची अधिकृत उमेदवारी व एबी फॉर्म असताना सुद्धा आपली उमेदवारी अर्ज दाखल केला नाही त्या ऐवजी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांची अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे काँग्रेस पक्षाला तोंडघशी पडावे लागले होते. या सर्व घटनेची काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेण्यात आली असून आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेस पक्षाने अखेर रविवारी शिस्तभंगाची कारवाई करत या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे, तसा आदेश पक्षाच्या शिस्तभंग समितीचे सचिव तारीक अन्वर यांनी काढला. या कारवाईनंतर आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी पक्षाने घेतलेली भूमिका न्यायाला धरून नाही, असे माझे मत असून चौकशी अंती सत्य समोर येईल, न्यायावर माझा विश्वास आहे असे ट्विट केले. दरम्यान नाशिक पदवीधर मतदार संघात दररोज नव नवीन ट्विस्ट पाहायला मिळत असून नक्की काय चालू आहे हे जनतेला समजेनासे झाले आहे. मध्यंतरी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे जवळचे नातेवाईक असणाऱ्या तांबे परिवाराने भाजपाशी जवळीक साधल्याच्या व त्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठका झाल्याच्या बातम्या पेरल्या गेल्या. त्यातून स्व:पक्षातूनच निष्ठावंत असणाऱ्या आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पक्षनिष्ठेवरच संशय घेतल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here