नगर – अहमदनगर शहरात सावेडी येथील मानसी डान्स स्टुडिओ च्यावतीने मंगळागौर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराची सुरूवात 1 ऑगस्टपासून एकविरा चौक, पाईपलाईन रोड आणि बालिकाश्रम रोड, नगर या तीन ठिकाणी सुरूवात होणार असून सदर शिबीर महिनाभर चालणार असल्याची माहिती शिबिराच्या प्रशिक्षिका मानसी देठे यांनी दिली आहे.
मंगळागौरची सगळ्यांनाच उत्सुकता असते. यानिमित्त होणारे विविध नृत्य, खेळ याची तयारी करण्यासाठी मंडळांची जय्यत तयारी सुरू असते. वर्षभर घरकाम, आणि नोकरी यातून वेळ काढत महिला उत्सवात सहभागी होत असतात. यातून महिलांना आपले छंद जोपासण्याची तसेच आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळते. त्यातच हल्लीच्या आधुनिक युगात आपण आपले सण-उत्सव, पंरपरा विसरत चाललो आहोत, त्यामुळे मंगळागौरच्या कार्यक्रमातून या सण-उत्सव, परंपराला उजाळा देण्याचे काम केले जाते.
या शिबिरामध्ये मगंळागौर नृत्य, त्यातील वेगवेगळे खेळ आणि गाणी शिकवली जाणार आहे. या शिबिरात महिला, गृहिणी, नोकरदार महिलांना देखील सहभागी होता येणार आहे. तसे नोकरदार महिलांसाठी खास शनिवार आणि रविवारची बॅच देखील उपलब्ध असणार आहे.
या शिबिरात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रशिक्षिका मानसी देेठे यांनी केले आहे. नावनोंदणीसाठी सीमा देशमुख (मो.9689352011), अर्चना शिंदे (मो.9673770026), आणि प्रतिभा देठे (मो.9881531188) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.