शेतकरी विठ्ठल हापसे जखमी
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी :
मानोरी शिवारामध्ये आज सकाळपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून एका शेतकऱ्यावर प्राण घातक हल्ला चढवला आहे. सदर घटनेमध्ये शेतकरी बालंबाल बचावलाय मात्र परिसरात घाबरायटीचे वातावरण पसरले आहे. विठ्ठल रामभाऊ हापसे असे जखमी झालेले शेतकऱ्याचे नाव आहे. काल रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान हापसे वस्तीनजीक असलेल्या आण्णासाहेब तोडमल यांच्या उसाच्या शेतामध्ये ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांना हा बिबट्या दिसला. सदर घटनेची माहिती शेतकऱ्यांना समजताच बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी गर्दी केली.
दबा धरून बसलेल्या या बिबट्याने शेजारील शेतात गिन्नी गवत तोडत असलेल्या विठ्ठल हापसे या शेतक-यावर हल्ला चढवला सदर हल्ल्यामध्ये शेतकऱ्यांच्या हाताला आणि दंडाला जखमा झाल्या असून मानोरी येथील डाॅ. अजिक्य आढाव यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
सदर घटनेनंतर लगेचच अमजत पठाण यांच्या शेतात पळताना बिबट्या शेतकऱ्यांचे निदर्शनास आल्याने या ठिकाणी परिसरात मोठी गर्दी जमली होती. वन विभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरे लावून बिबट्याला पकडण्यासाठी मोहीम राबवावि अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. बिबट्या आता लोकवस्तीकडे मुक्त संचार करत असून शेतकऱ्यांसह लहान मुलांनी आता काळजी घेणे गरजेचे आहे.