मायेची उब देणारी जेष्ठ माणसं सांभाळावित -संजय फंड

0

कोपरगाव – ( वार्ताहर / प्रतिनिधी ) – 

आजच्या तरुण पिढीने आपल्या आयुष्याला मायेची उब देणारी जेष्ठ माणसं सांभाळावित, जेष्ठ नागरिक हि अनुभवाची विद्यापीठे आहेत, आपल्या संकटकाळात ते योग्य मार्गदर्शन करून धिर देऊन आधार देतात, त्यांचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे ” असे विचार राहाता लायन्स, शब्द गंध साहित्यिक परीषद अहमदनगर शाखेचे संजय फंड यांनी कोपरगाव येथील एका समारंभात व्यक्त केले.

शब्द गंध साहित्यिक परीषद महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखेच्या वतीने व राष्ट्र भाषा सेवा मंच, स्व. र म परिख हिंदी तथा मराठी सार्वजनिक ग्रंथालय वाचनालयाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती, कवी प्रमोद येवले यांचा वाढदिवसानिमित्त व राष्ट्रीय समाज भूषण पुरस्काराचे मानकरी राजेंद्र फंड यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी कवी राजेंद्र ( सुधिर )  कोयटे, प्रमुख पाहुणे म्हणून  संदिप वपॆ, अध्यक्ष कैलास साळगट, कार्याध्यक्ष प्रा डॉ संजय दवंगे, कुंभारी येथील वाचनालयाचे रमन गायकवाड उपस्थित होते.

या वेळी मनोगत व्यक्त करताना संदिप वपॆ म्हणाले की, ” वाचनालयाच्या माध्यमातून मने समृद्ध होतात, प्रत्येक घरात एक शेफ ( छोट ) वाचनालय असावं, मला वाढदिवसाच्या निमित्ताने मिळालेले ग्रंथ मी मनःपूर्वक वाचून संग्रही ठेवले आहेत. कोपरगाव शहरातील जेष्ठ लेखक डॉ दादासाहेब गलांडे, मंसाराम पाटील आणि अजूनही खूप लेखक आहेत. राजेंद्र कोयटे यांच्या कवितेवर भाष्य करताना ते म्हणाले की आजच्या काळात जे काही चालू आहे त्याला जनताही जबाबदार आहे. जनतेने विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.” या प्रसंगी इतीहासाचे अभ्यासक विठ्ठल मैंदड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कविसंमेलनाबरोबरच इतरही कार्यक्रम राबविण्यात यावे अशी भावना व्यक्त केली. साहित्य प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते अशोक आव्हाटे यांनी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या वेळी अनंत बर्गे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. छायाचित्रकार हेमचंद्र भवर यांनी आभाळाचे रंग हि कविता सादर केली, कवी कैलास साळगट यांनी शेतकरी कविता सादर करून शेतकऱ्यांची व्यथा मांडली, कवी नंदकिशोर लांडगे यांनी आईच्या आठवणी, महती असणारी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. स्वाती ताई मुळे यांनी जेष्ठ नागरिकांच्या उतारवयातील भावना व्यक्त करताना मनाची होणारी घुसमट व्यक्त केली. प्रा. मधुमिता निळेकर यांनी सामाजिक संदेश देणारी कविता सादर केली.

या प्रसंगी शब्द गंध साहित्यिक परीषद महाराष्ट्र राज्य अहमदनगर शाखेचे प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र फंड यांना नुकताच राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल कोपरगाव शाखेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. कवी प्रमोद येवले यांच्या वाढदिवसानिमित्त शाल श्रीफळ पुष्पगुच्छ ग्रंथ देऊन गौरविण्यात आले.

स्वागत व प्रास्ताविक प्रा डॉ संजय दवंगे यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा मधुमिता निळेकर यांनी केले. आभार प्रदर्शन हेमचंद्र भवर यांनी केले. समारंभासाठी शब्द गंध साहित्यिक परीषदेचे प्रतिनिधी, गृहरक्षक दलाचे सोमनाथ शिंगाडे आणि सहकारी, वाचनालयाचे सभासद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here