संगमनेर : २५ वर्षापासून मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने आयोजित केला जाणारा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा सर्व धर्मीयांसाठी एक आदर्श उपक्रम आहे. जनहिताच्या या उपक्रमाचे अनुकरण सर्वत्र झाले पाहिजे. साधेपणाने लग्न समारंभ करण्याचा संदेश सर्वांनी मनावर घेतला तर कर्जबाजारीपणातून होणाऱ्या आत्महत्या होणार नाहीत असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केले.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने मालपाणी लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आमदार सत्यजित तांबे बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात, कॉम्रेड कारभारी उगले, कॉम्रेड ज्ञानदेव सहाणे, मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी, डॉ.संजय मालपाणी, गिरीश मालपाणी, जय मनीष मालपाणी उपस्थित होते.
आमदार तांबे यांनी मालपाणी उद्योग समूह आणि मालपाणी परिवाराचे विशेष कौतुक केले. १९९७ साली सुरू केलेली सामुदायिक विवाहाची परंपरा अखंड चालविण्याचे काम मालपाणी परिवाराने कायम ठेवले आहे. सामाजिक उत्तरदायित्व पूर्ण करण्याची वृत्ती यातून दिसून येते. सामुदायिक विवाहामुळे समाजात जागृती होत आहे. खूप खर्चिक लग्न करण्याच्या चढाओढीमुळे एैपत नसल्याने मागील काही वर्षात कर्जापोटी आत्महत्या केल्याची उदाहरणे निष्पन्न झालेली आहेत. आर्थिक सुस्थितीत असलेल्या माहेश्वरी समाजामध्ये खर्चिक विवाह टाळण्यासाठी काही विशिष्ट नियम करण्यात आलेले आहेत त्याचे स्वागत केले पाहिजे असेही ते म्हणाले. माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी आपल्या भाषणामध्ये मालपाणी उद्योग समूहाच्या विवाह सोहळ्यातील २५ वर्षाच्या सातत्याचे आणि काटेकोर नियोजनाचे भरभरून कौतुक केले. डॉ.जयश्री थोरात यांनी सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून मालपाणी परिवार २५ वर्षापासून विवाह सोहळ्याचे आयोजन करीत आहे त्याला सर्व धर्मामधून चांगला प्रतिसाद मिळतो ही अत्यंत समाधानाची गोष्ट असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक करताना डॉ.संजय मालपाणी यांनी मालपाणी उद्योग समूह या संपूर्ण सोहळ्यामध्ये वधू पित्याच्या भूमिकेत असतो त्याचे खूप मोठे समाधान मिळते. आज वरच्या वाटचालीत १२५६ परिवार जोडण्याची कामगिरी सर्वांच्या साथीने करणे शक्य झाले. आज विवाहबद्ध झालेल्या २७ दांपत्यापैकी १३ विवाह हे अंतरजातीय असून अनेक वधू वर एमबीए, इंजिनियर, पदवीधर, द्विपदवीधर असे उच्चशिक्षित असून रत्नागिरी,औरंगाबाद, पुणे, नाशिक, नगर या पाच जिल्ह्यातील वधू-वरांनी आपल्या जीवनाचा वैवाहिक शुभारंभ करण्यासाठी येथील सोहळ्याची निवड केली ही बाब अभिमानास्पद असल्याचे डॉ.संजय मालपाणी यावेळी म्हणाले. बौद्ध विवाहाचे विधी बौद्धाचार्य भाऊसाहेब देठे व त्यांच्या पत्नी प्रतिभाताई यांनी तर हिंदू पद्धतीच्या विवाहाचे विधी भाऊ जाखडी यांनी केले. आभार गिरीश मालपाणी यांनी मानले. सूत्रसंचालन मुरारी देशपांडे व राम पाटसकर यांनी केले. या सामुदायिक विवाह सोहळ्यात २४ हिंदू आणि ३ बौद्ध दांपत्य विवाहबद्ध झाले.