देवळाली प्रवरा / प्रतिनिधी खात्यावर ऑनलाईन पेमेंट पाठवा, तूमचा माल तूमच्या दुकानात पोहच होईल. असे सांगून राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा येथील नरेंद्र मुथा या व्यापाऱ्याला सुमारे तीन लाख रूपयांना गंडवील्याचा प्रकार नूकताच उघडकीस आलाय. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यापाऱ्याने पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे.
नरेंद्र खुशालचंद मुथा, वय ५५ वर्षे, रा. देवळाली प्रवरा ता. राहुरी. यांचे देवळाली प्रवरा येथे मुथा सेल्स नावाचे एजन्सींचे दुकान आहे. मुथा हे त्यांच्या दुकानात तेल व खाद्य पदार्थांची ठोक खरेदी व विक्री करतात. त्यांना ठोक स्वरुपात कंपनीकडुन तेल खरेदी करावयाचे असल्याने त्यांनी ९ जानेवारी रोजी मध्यप्रदेश येथील व्हीपी इंडस्ट्रीज देवास यांचा संपर्क क्रमांक असलेल्या व्हाॅट्स ॲप नंबरवर मेसेज केला. त्यांनी नरेंद्र मुथा यांना व्हीपी इंडस्ट्रीज देवास राज्य मध्यप्रदेश या कंपनीचे तेलाचे दर पाठवले. त्यावेळी नरेंद्र मुथा यांनी सोयाबीन तेलाची ऑर्डर देऊन दिनांक १० जानेवारी २०२३ रोजी मुथा यांनी त्यांच्या खात्यावर २ लाख ६१ हजार रूपये पाठवीले. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी दिनांक ११ जानेवारी रोजी फोन आला व तुम्ही काल तेल खरेदी करण्यासाठी जी ऑर्डर दिली आहे, ती गाडी लोड करण्यात येत आहे. तुम्हाला अजुन २० सोयाबीन तेलाचे बॉक्स खरेदी करावे लागेल. नरेंद्र मुथा यांनी आणखी ३० हजार १२० रूपये त्यांनी दिलेल्या खाते नंबरवर पाठवीले. अशा प्रकारे त्यांनी एकूण २ लाख ९१ हजार १२० रूपये त्यांच्या खात्यावर पाठवीले. त्यांच्याकडून व्हाॅट्सॲप द्वारे पेमेंट मिळाले. तसेच १५ जानेवारी पर्यंत तुम्हाला माल तुमचे दुकानावर पोहोच होईल असा मेसेज पाठविला. १६ जानेवारी पर्यंत माल पोहोच न झाल्याने नरेंद्र मुथा यांनी त्यांचे व्हाॅट्स ॲप नंबरवर मेसेज केला. तेव्हा त्याने माझी आई वारली आहे. तुमचा माल दोन दिवसांनी पाठवतो असे मेसेजव्दारे सांगीतले. नरेंद्र मुथा यांनी दोन दिवस वाट पाहून तेलाचा माल पोहोच न झाल्याने त्यांना व्हाॅट्स ॲपवर मेसेज केला. त्यांनी काहीएक प्रतिसाद दिला नाही. नरेंद्र मुथा यांनी चौकशी केली असता त्यांनी ज्या खात्यावर रक्कम पाठवली. ते खाते अनामिका सिंग यांचे नावावर असुन ते राजस्थान मधील कोटा येथील आहे. अशी माहिती मिळाली.
नरेंद्र मुथा यांनी व्हीपी इंडस्ट्रीज देवास राज्य मध्यप्रदेश येथे त्यांचे अधिकृत फोनवर संपर्क करुन तेलाचे ऑर्डर बाबत विचारले असता त्यांनी सांगीतले आम्हाला तुमची तेलाची कुठलीही ऑर्डर मिळालेली नसुन पैसेही आमचे व्हीपी इंडस्ट्रीज देवास राज्य मध्यप्रदेशच्या बँक खात्यावर जमा झालेले नाही. असे सांगीतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नरेंद्र खुशालचंद मुथा यांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अनोळखी इसमा विरोधात गुन्हा रजि. नं. ७६/२०२३ भादंवि कलम ४२०, ४६५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलिस निरीक्षक घनःशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.