कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी मधुकर भानुदास काळे व उपाध्यक्षपदी यशवंतराव लक्ष्मणराव देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
माहेगाव देशमुख सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष संजय गोविंदराव काळे व उपाध्यक्ष डॉ. शिवाजी भानुदास रोकडे यांनी रोटेशन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अध्यासी अधिकारी नामदेवराव ठोंबळ सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, कोपरगाव यांच्या उपस्थितीत निवडणूक पार पडली. यावेळी अध्यक्षपदासाठी मधुकर काळे यांच्या नावाची सूचना संजय काळे यांनी मांडली त्या सूचनेला भरत दाभाडे यांनी अनुमोदन दिले.उपाध्यक्षपदासाठी यशवंतराव देशमुख यांच्या नावाची सूचना डॉ.शिवाजी रोकडे यांनी मांडली त्या सूचनेला जगन्नाथ जाधव यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकाच नावाची सूचना आल्यामुळे निवडणूक अधिकारी नामदेवराव ठोंबळ यांनी अध्यक्षपदी मधुकर भानुदास काळे व उपाध्यक्षपदी यशवंतराव लक्ष्मणराव देशमुख यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी संचालक संजय काळे, डॉ शिवाजी रोकडे, अशोकराव विश्वनाथ काळे, भरत दाभाडे, वसंत काळे, शिवाजी लांडगे, भागीनाथ काळे, जगन्नाथ जाधव, सौ.संगीता सूर्यभान काळे, सौ.उर्मिला चंद्रकात कापसे उपस्थित होते. निवडणूककामी सेक्रेटरी संदिप बोरनर यांनी सहकार्य केले.
सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष मधुकर भानुदास काळे व उपाध्यक्ष यशवंतराव लक्ष्मणराव देशमुख यांचे संस्थेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.