कोपरगाव दि.
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व कोपरगावचे माजी आमदार के. बी. रोहमारे यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध मराठी लोककवी प्रा. प्रशांत मोरे व नाशिक येथील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. प्रशांत आंबरे को. ता. एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
याप्रसंगी मागील ३४ वर्षांपासून देण्यात येणाऱ्या भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कारांचे वितरणही प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. यावर्षी नागू विरकर(मसाई वाडी, सातारा), गणपत जाधव (यशवंत नगर जि. सोलापूर), आप्पासाहेब खोत(जाखले जि. कोल्हापूर), मनीषा पाटील((देशिंग हरोली, जि. सांगली)), प्रवीण पवार(खंबाळ जि. धुळे), डॉ.रवींद्र कानडजे (बुलडाणा ), डॉ. मारोती घुगे (अंबड जि. जालना) इत्यादी मान्यवर लेखकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. प्रत्येकी रुपये १५०००/- स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव अॅड. संजीव कुलकर्णी व के. जे. सोमैया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी येथे दिली.
७ डिसेंबर रोजी के. बी. रोहमारे यांच्या पोहेगाव येथील स्मारकास सकाळी ८ वाजता पुष्पचक्र अर्पण करून या कार्यक्रमास आरंभ होईल. सकाळी १०.०० वाजता भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार वितरण के. जे. सोमैया महाविद्यालयामध्ये करण्यात येईल. तरी परिसरातील साहित्यरसिकांनी व नागरिकांनी उपस्थित रहावे आणि श्रवणीय अशा या शब्दसोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन संस्थेचे सचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे.