मोकाट श्वानांचा नागरिकांना चावा,उपचाराची व्यवस्था स्थानिक पातळीवर व्हावी – पराग संधान

0

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव शहरात सतरा ते अठरा नागरिकांना मोकाट श्वानांनी चावा घेतला असून त्यांना उपचारासाठी नगर येथे पाठविले गेले आहे. मोकाट प्राण्यांचा बंदोबस्त केला नसल्याने अनेकदा असा दुर्घटना घडतात. यात उपचारासाठी लागणाऱ्या लसीची उपलब्धता जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने आणि खाजगी रुग्णालयात त्यांची किंमत अधिक असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,युवानेते विवेक कोल्हे यांनी तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करत वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क केला. त्यामुळे या जखमी रुग्णांना मदत वेळीच उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करता आले. यापुढे मात्र अशा अधिकच्या दुर्घटना घडू नये यासाठी पालिकेने काळजी घ्यावी. या प्रकाराच्या घटनेत उपचाराच्या लस स्थानिक ठिकाणी उपलब्ध व्हाव्या यासाठी ग्रामीण रुग्णालय व आरोग्य विभागाच्या मदतीने उपाययोजना करावी अशी मागणी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान यांनी मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याकडे केली आहे.

याच विषयाला गती मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष दत्ता काले यांनी दिलेल्या निवेदनात शहरात वाढलेले डासांचे प्रमाण हे आजारांचा फैलाव करणारे आहे.मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे रस्त्यांवर बसलेले असतात त्यामुळे वाहतूकिची कोंडी आणि अनेकदा नागरिकांना त्या जनावरांच्या हल्ल्यात जखमी होण्याच्या घटना घडतात. स्नेहलताताई कोल्हे यांनी मोठ्या दूरदृष्टीने बाजार ओटे शहरासाठी निर्माण केले मात्र त्या भागात पालिकेने वीज, सी सी टीव्ही यांचे व्यवस्थित नियोजन न केल्याने अंधारात त्या भागात मद्यपी आणि इतर व्यसने करणाऱ्या टोळ्या जमा होतात.नुकतेच कुणी तरी व्यसनी व्यक्तीने ज्वलनशील वस्तू फेकल्याने पालिकेचा कचरा डेपोला आग लागली होती.

अशा असंख्य समस्या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत.नागरिकांना योग्य सुविधा देण्याची जबाबदारी पालिकेची असून केवळ कर घेणे ही भूमिका प्रशासनाने न ठेवता त्या दर्जाच्या सुविधा देखील पुरविणे गरजेचे आहे.उन्हाळा सुरू झाला असून अधिक तीव्र उष्णता येत्या काळात वाढणार आहे त्यामुळे पाण्याच्या नियोजनात हलगर्जीपणा करू नये आणि अधिक दिवसांनी पाणी मिळेल असे काही नियोजन न करता दिवसाआड पाणी देण्याचा प्रयत्न करावा अशी देखील मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here