श्री समर्थ प्रशालेचे वार्षिक विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न
अहिल्यानगर – मोबाईलप्रेमींनी मोबाईलची माळ घालून केलेली मोबाईल देवाची आरती,प्रत्येक घरातील आई काली माता बनून घरातल्या मोबाईल सुराचा वध करते.आत्ताचा मौल्यवान वेळ मोबाईल मध्ये घालवण्याऐवजी भविष्य घडवण्यासाठी खर्च करा असे आवाहन पालकांना करते.मोबाईलमध्ये गुंतलेल्या वडिलांना पैसे देऊन वेळ विकत मागणारा मुलगा,माझा अभ्यास घे म्हणत आईच्या हाता पाया पडणारी मुलगी,सर्वांचेच दैनंदिन जीवन नासवणारे ॲप्सचे राक्षस अशा प्रसंगांमधून रसिक प्रेक्षकांचे पाणावलेले डोळे…असे चित्र होते सावेडीच्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेच्या वार्षिक विविध गुणदर्शन कार्यक्रमातील सुमारे ८० विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मोबाईल विकणे आहे या बालनाट्याचे.
मनपाचे आयुक्त डॉ यशवंत डांगे यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले.यावेळी प्रशालेचे चेअरमन ॲड.किशोर देशपांडे,मंडळाचे उपाध्यक्ष दीपक ओहोळ,चेअरमन विकास सोनटक्के ,व्हाईस चेअरमन श्रीपाद कुलकर्णी , सचिव सुरेश क्षीरसागर, कार्यकारिणी सदस्य संध्या कुलकर्णी , ॲड.वेद देशपांडे ,सुनील जोशी,सचिन क्षीरसागर, प्राचार्या संगीता जोशी ,पर्यवेक्षक सुनील कानडे आदी मान्यवरतसेच शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोबाईलच्या अतिवापरावर उपाय सांगणाऱ्या संकल्पना बालनाट्यात सांगण्यात आल्या आहेत. शिक्षक डॉ.अमोल बागुल यांनी मोबाईल मुक्तीची पंचसूत्री बालनाट्यातून दिग्दर्शित करताना पालकांनी ३०-६०-९० सूत्राचा वापर करावा.म्हणजे सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटे मोबाईल बघायचा नाही व दुपारी जेवणानंतर ६० मिनिटे मोबाईल पाहायचा नाही व रात्री झोपण्याअगोदर ९० मिनिटे मोबाईलला हात लावायचा नाही.विविध छंद, कलाकौशल्य ,योगासने, प्राणायाम,मेडिटेशन ,मैदानी खेळ यामध्ये स्वतःसह मुलांना देखील गुंतवावे.पालकांनी शक्यतो कीपॅडचे मोबाईल फक्त कॉलकरिता वापरावे व अँड्रॉइड मोबाईलचा वापर गरजेपुरताच करावा अशी सवय मुलांना देखील होईल. २४ तासातले किमान १० तास मोबाईल बंद ठेवावा.”नो मोबाईल डे” आठवड्यातून एकदा तरी साजरा करावा.हे पाच सूत्र सांगितले.
या नाटकाचे संहिता लेखन दिग्दर्शन निर्मिती व मोबाईलच्या आरतीचे लेखन डॉ. बागुल यांनी केले तर सहाय्यक म्हणून शिक्षक सुनील रायकर यांनी भूमिका पार पाडली.नृत्य दिग्दर्शन सिनेमा-मालिकेतील बालकलाकार कु.श्रीशा आकडकर,कु.त्रिशा भिसे व कु. कनिष्का सूर्यवंशी यांनी केले तर मोबाईल आरतीगायन, संगीत व रेकॉर्डिंगमध्ये गायक जितेंद्र बारस्कर यांनी योगदान दिले.सुमारे २५ मिनिटांच्या बालनाट्यामध्ये ४ गीतांवरील नृत्याचा देखील समावेश होता.