मोबाईल सेवा देणाऱ्यांनी एकत्रित लघूसंदेशाची माहिती निवडणूक यंत्रणेला द्यावी-जिल्हाधिकारी

0

अहिल्यानगर, दि.१७- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत राजकीय प्रचारासाठी पाठविण्यात येणाऱ्या एकत्रित लघूसंदेशाची (बल्क एसएमएस) माहिती मोबाईल सेवा देणाऱ्यांनी निवडणूक यंत्रणेला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. बैठकीस उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी अतूल चोरमारे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी गजानन नकासकर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांकडून बल्क एसएमएसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. माध्यमांवर कुठल्याही प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला जाऊ नये, यासाठी  जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीने परवानगी दिलेल्या जाहिरातीचे संदेश पाठविण्यात यावेत.बल्क एसएमएसची माहिती प्रत्येक विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना किंवा एमसीएमसी समितीला द्यावी.

मतदानाच्या आधीचे ४८ तासाचा कालावधी शांतता कालावधी असल्याने या कालावधीत कुठल्याही प्रकारचे मेसेज प्रसारित होणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिल्या. जिल्ह्यात १२ विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्र परिसरात मोबाईल नेटवर्क पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहील, यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here