कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाच्या समस्या काय आहेत याचा बारकाईने अभ्यास करून हे प्रश्न कसे सोडविता येतील त्याचा देखील पूर्णपणे अभ्यास केला होता. त्यामुळे या पाच वर्षात मतदार संघातील जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करू शकलो असलो तरी यापुढील काळात विकासाबरोबरच कोपरगावची बाजारपेठ फुलविण्यावर भर देणार असल्याचे महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजितदादा पवार गट) अधिकृत उमेदवार आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
कोपरगाव शहरातील टिळकनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत ते बोलत होते. यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहराचे अनेक विकासाचे प्रश्न होते. हे प्रश्न मी सहजपणे सोडवू शकतो याची मला खात्री होती त्यामुळे मी बिनदिक्कतपणे मतदार संघातील जनतेला आश्वासित केले.जनतेने देखील माझ्यावर विश्वास दाखविला आणि मी देखील संपूर्ण मतदार संघातील रस्ते, वीज, पाणी,आरोग्य आदी महत्वाचे प्रश्न या पाच वर्षात सोडविले आहे.
कोपरगाव शहरविकासाच्या अनेक संकल्पना माझ्याकडे आहेत आणि त्या संकल्पना सत्यात उतरविण्याचा विश्वास देखील माझ्याकडे आहे. त्यामुळे या पाच वर्षात जेवढा विकास झाला त्यापेक्षा जास्त विकास करून दाखवीन. पाच वर्षात कोपरगाव शहराचा विकास झाल्यामुळे कोपरगावच्या बाजारपेठेला पुन्हा उर्जितावस्था देखील प्राप्त होत आहे. हे दोन तीन वर्षापासून कोपरगाव शहराच्या वाढलेल्या आर्थिक उलाढालीवरून छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना जाणवत आहे. ५ नंबर साठवण तलावामुळे नागरिकांना तीन दिवसाआड नियमित पाणी मिळत असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे कोपरगावच्या बाजारपेठेचे गेलेले गतवैभव देखील परत येत आहे. कोपरगाव शहराच्या बाजार पेठेला पुन्हा फुलविण्यासाठी जे काही करता येईल त्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करीत आहे आणि यापुढे देखील करणार आहे. त्यासाठी कोपरगाव शहरातील प्रत्येक प्रभागातील सुज्ञ मतदारांनी जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी यावेळी केले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व टिळकनगर भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.