कोपरगाव : रब्बी हंगाम २०२२- २३ मधील पाणी कोपरगाव शहराला मिळावे अशी मागणी कोपरगाव तालुका शेतकरी कृती समिती व सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंता नाशिक पाटबंधारे विभागाकडे केली आहे . आपल्या मागणी पत्रकात समितीने म्हटले आहे की रब्बी हंगाम २०२२-२३ करिता गोदावरी कालव्यांना दिनांक २६ डिसेंबर २०२२ रोजी आवर्तन सोडण्यात आले. कोपरगाव नगरपरिषदेचे सर्व साठवण तलाव रिकामे झाल्यामुळे सदरचे आवर्तनाचे नियोजन काही दिवस आधी केले. वास्तविक आर्वतन कालावधी हा १ जानेवारी २०२३ ते २ फेब्रुवारी २०२३ दरम्यानचा होता. मुळात रब्बी हंगाम तसेच उन्हाळी हंगाम पाटपाणी नियोजनाची कालवा सल्लागार समितीची बैठक ही रब्बी हंगाम संपता संपता नागपूर येथील अधिवेशनात घेतली व शेतकऱ्यांना विचारात न घेता तसेच शेतकरी पिक पाण्याचे नियोजन विचारात न घेता जानेवारीपासून रब्बीचे पहिले आवर्तन सोडण्यात येईल असे जाहीर केले. वास्तविक पाहता शासकीय रब्बी हंगाम हा नोव्हेंबर मध्ये सुरू होत असतो. तरी रब्बी हंगाम पिकासाठी जानेवारीमध्ये आवर्तन मिळणार असल्यामुळे सुमारे दोन महिन्याचा पिकांचा कालावधी वाया गेल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांना आपले रब्बीच्या पिकांचे नियोजन करणे शक्य झाले नाही . परिणामी बहुतांश लाभधारक शेतकऱ्यांनी रब्बी तसेच नवीन उसाची लागवड केली नाही .त्यामुळे यावेळेस सलग तिसऱ्या वर्षी पाण्याचे आवर्तन मध्येच बंद करण्याची वेळ पाटबंधारे विभागावर आली असून त्यास आपला विभागातर्फे शेतकऱ्यांची मागणी कमी असणे हे कारण देणे पूर्णपणे चुकीचे आहे. यावर्षी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत रब्बी आवर्तनासाठी सुमारे ३ टीएमसी पाणी वापर विचारात घेऊन पाणी आरक्षित करण्यात आले होते. आता रब्बीचे आर्वतन दिनांक १३ जानेवारी २०२३ रोजी बंद केल्यामुळे रब्बीचे पाणी हे मोठ्या प्रमाणात शिल्लक राहणार आहे. अशा वेळेस उन्हाळा हंगामासाठीच्या राखीव पाणी साठ्यास धक्का न लावता सदरचे रब्बी हंगामातील शिल्लक पाणी हे कोपरगाव शहराला मिळावे. कारण सध्या कोपरगाव नगरपरिषद ही शहराला ६ दिवसाआड पाणीपुरवठा करते आहे. त्यांच्याकडे असणारी त्यांची साठवण क्षमता ही मंजूर पाणी कोट्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे ते पूर्ण क्षमतेने पाणी घेत नाही अशी तक्रार आहे. कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे रब्बीचे पाणी हे कोपरगाव शहराला द्यावे जेणेकरून कोपरगाव शहराला दररोज पाणीपुरवठा करणे शक्य होईल व कोपरगाव शहरातील नागरिकांना तहानलेल्या नागरिकांना दिलासा मिळेल अशी विनंती या निवेदवाद्वारे केली आहे. .
या पत्रकावर माजी नगराध्यक्ष पद्माकांतजी कुदळे, प्रविण शिंदे, संतोष गंगवाल, तुषार विद्वांस, अँड. नितीन पोळ, निसार शेख, योगेश गंगवाल, नितीन शिंदे, अनिल गायकवाड, विजय जाधव आदी यावेळी उपस्थित होते