देवळाली प्रवरा/ प्रतिनिधी
राहुरीतील राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेच्या शासकीय लेखा -परीक्षणात ७ कोटी ३७ लक्ष ६२ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट होताच ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील पतसंस्थेचा व्यवस्थापक कारभारी फाटक याला राहुरी पोलिसांनी काल टाकळीमिया येथील लाख रस्त्यावरील एका हॉटेलवरून गजाआड केले आहे.
राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेमध्ये अपहार झाल्याने ठेवी मिळत नसल्याने ठेवीदार अडचणीत सापडले होते. ठेवीदार बचाव कृति समितीच्या अनेक तक्रारीनंतर जिल्हा निबंधकांच्या आदेशानुसार लेखा परीक्षक संजय धनवडे व सहाय्यक अनिल निकम, रियाज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता जिजाऊ पतसंस्थेच्या कामकाजाचे लेखापरीक्षण करण्यात आले. १ एप्रिल २०१६ ते सन ३१ मार्च २०२१ या कालावधीमध्ये झालेल्या सर्व व्यवहारांच्या चौकशीमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार करण्यात आल्याचे उघडकीस आले. राजमाता पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब येवले, उपाध्यक्ष शरदराव निमसे,व्यवस्थापक कारभारी फाटक, सुनील भोंगळ, उत्तम तारडे, सुरेखा सांगळे, सुरेश पवार, दत्तात्रय बोंबले, दीपक बंगाळ या ९ जणांनी पतसंस्थेमध्ये ७ कोटी ३७ लक्ष ६२ हजार रुपयांचा अपहार केल्याचा लेखा परीक्षणात ठपका ठेवण्यात आला आहे.
राहुरी पोलिसांत लेखापरीक्षक संजय धनवडे यांनी या ९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे सर्व आरोपी फरार झाले आहेत. त्यातील काही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव सुध्दा घेतली होती. व्यवस्थापक कारभारी फाटक यांना २० एप्रिल २०२३ रोजी न्यायालयाने जामीन नाकारल्याने तपासाचे चक्र वेगाने फिरू लागली.या गैरव्यवहाराचा तपास जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राठोड व पो.नि. पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असतानाच काल पतसंस्थेचा व्यवस्थापक कारभारी फाटक टाकळीमिया येथील लाख रस्त्यावरील हॉटेलात असल्याची
माहिती गुप्त खबऱ्याकडून राहुरी पोलिसांना मिळाली. राहरी पोलीस टाकळीमिया येथील हॉटेलवर गेले असता पोलिसांची गाडी पाहून कारभारी फाटक शेतात पळू लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला चांगलाच चोप देऊन त्याच्या मुसक्या आवळल्या व त्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या हवाली करण्यात आले. कारभारी फाटक याला अटक झाल्यानंतर पुढील तपासात कोणा-कोणाची नावे पुढे येतात याकडे ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक आर्थिक गुन्हे शाखेने संयुक्त योग्य तो तपास करून या अपहारास जबाबदारीनुसार संचालक मंडळाची मूकसंमती असल्याने एमपीआयडी कायद्यानुसार सर्व संचालकांवर दोष निश्चिती करून गुन्हे दाखल करावेत. आपले पैसे परत मिळतील की नाही या चिंतेने दोन ठेवीदारांचे बळी सुध्दा गेले आहेत. या ठेवीदरांचे कष्टाचे पैसे परत मिळण्यासाठी योग्य ती कडक कारवाई तपास यंत्रणेने करावी, अशी मागणी ठेवीदारांकडून होत आहे.