अहमदनगर : – रयत शिक्षण संस्थेच्या गुणवत्ता वाढ प्रकल्पांतर्गत माध्यमिक शाळांचे मूल्यांकन व प्रमाणीकरण करून घेणे व शाळांची गुणवत्ता आश्वासीत करण्यासाठीं शैक्षणिक,भौतिक तसेच संस्थात्मक गुणवत्ता वाढीच्या उद्देशाने राज्य शासनाने राष्ट्रीय पातळीवरून शाळासिद्धी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. रयतच्या संस्थांतर्गत विशेष पथकाने शासनास आपेक्षित शाळा सिद्धि मूल्यमापन केले असून त्यामध्ये येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील ज्युनिअर कॉलेज विभागास ‘अ’ मानांकन प्राप्त झाल्याबद्दल शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते व पदाधिकाऱ्यांनी प्राचार्य डॉ. शंकर थोपटे व ज्युनिअर कॉलेज शिक्षकांचा महाविद्यालयात जाऊन सत्कार केला असल्याची माहिती विभाग प्रमुख प्रा. सतीश शिर्के यांनी दिली आहे.
यावेळी प्रा. विधाते म्हणाले की, या महिला महाविद्यालयाने शिस्त, संस्कार व गुणवत्ता सिद्ध करत शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात आपला ठसा उमटवला आहे. मुलींच्या उत्तम शिक्षणासाठी येथील शिक्षक सतत प्रयत्नशील असतात त्यामुळेच महाविद्यालयास ‘अ’ मानांकन प्राप्त झाले आहे त्याचा शहराला निश्चितच अभिमान वाटतो.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. थोपटे यांनी महाविद्यालयाच्या भविष्यातील उपाय योजनांची माहिती सांगितली. तर प्रा. सतीश शिर्के यांनी महाविद्यालयात राबविण्यात येत असणाऱ्या शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमांचा गोषवारा सांगत, रयत व महाविद्यालय विकास समितीच्या खंबीर साथीचा आवर्जून उल्लेख केला.
यावेळी राष्ट्रवादी कामगार जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, अनंत गारदे, उद्योग व व्यापार सेल, गणेश सर बोरुडे सरचिटणीस राष्ट्रवादी, विशाल म्हस्के कार्याध्यक्ष कामगार सेल राष्ट्रवादी आदी मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शाळा सिध्दी समन्वयक प्रा. अनिल जाधव, प्रा. शिवाजी जासूद, प्रा. अनुप शिंदे, प्रा. अजय जाधव, प्रा. शिर्के, संतोष चव्हाण यांच्या विशेष सन्मानासह सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.महाविद्यालयाच्या या यशाबद्दल आ. आशुतोष काळे, मा. आ. अशोकराव काळे, स्नेहलताई शिंदे व पालकांनी अभिनंदन केले आहे.