राष्ट्रीय चर्मकार महासंघ विधानसभेला 50 जागा लढविणार – बबनराव घोलप

0

राष्ट्रीय, राज्यस्तरीय कार्यकर्ता संमेलनात मोठी घोषणा

नगर –  चर्मकार समाजाचे 13-14 आमदार असून देखील चर्मकार समाजाच्या वाट्याला उपेक्षाच येत असते असे सातत्याने पाहण्यात येते. परंतु इथून पुढील काळात असे होऊ द्यायचे नाही. राष्ट्रीय चर्मकार महासंघ आतापर्यंत अराजकीय संघटना म्हणून कार्यरत होती, यापुढे राजकीय क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने संघटनेच्या वतीने महाराष्ट्रात 50 जागा लढवणार, अशी घोषणा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी केली.

     राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार तसेच राज्य पदाधिकारी कार्यकर्ता संमेलनाप्रसंगी ते बोलत होते. पुण्यातील भोसरी येथील कै.अंकुशराव नाट्यगृह येथे नुकत्याच झालेल्या या संमेलनात संपूर्ण महाराष्ट्रातून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय, राज्य तसेच जिल्ह्यातून असंख्य असे पदाधिकारी उपस्थित होते.

     पुढे बोलतांना चर्मकार समाजाच्या प्रश्‍नासाठी उन्नती आणि विकासासाठी कोणत्याच आमदाराला महत्व दिले जात नाही. जर आमदारांची संख्या जास्त असेल तर निश्‍चित समाजाचा विचार करावाच लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे राज्यकर्ती, शासनकर्ती जमात व्हा, जेव्हा असे होईल तेव्हाच समाजाला न्याय मिळेल आणि आता राज्यकर्ते शासनकर्ते होण्याची वेळ आलेली आहे. जेव्हा बहुसंख्येने चर्मकार समाजातील आमदार प्रश्‍न उपस्थित करतील तेव्हा सरकारला त्याची दखल घ्यावीच लागेल.

    

एखादा समाज तेव्हाच प्रगत होतो, जेव्हा त्याच्या विकास आणि उन्नतीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना शासन अंमलात आणते आणि त्यासाठी चर्मकार समाजाच्या आमदारांची संख्या जेव्हा एखादा मुख्यमंत्री निवडण्यास निर्णायक ठरेल तेव्हा चर्मकार समाजाचा सगळेजण विचार करतील आणि समाजाचा हित साधले जाईल.

     ओपन जागेवरून जेव्हा चर्मकार समाजाचा उमेदवार आमदार होऊ शकतो तर राखीव जागेवरून का नाही, चर्मकार समाज सगळ्यात मिळून मिसळून वागणारा समाज असल्याने इतर समाज देखील चर्मकार समाजाकडे आशेने, सहानुभूतीने पाहत असतो. त्यामुळे या विधानसभेला राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने 50 जागा लढवणार आणि तेव्हाच मुख्यमंत्री निवडताना चर्मकार समाजाचा विचार निश्‍चित होईल. असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.

     राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय सचिव ज्ञानेश्‍वर कांबळे व प्रा. शशिकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी शाखेच्यावतीने आयोजित कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रीय राज्य पदाधिकारीसह भानुदास विसावे, सरोजताई बिसूरे, माधवराव गायकवाड, शांताराम कारंडे, अनिल कानडे, राजेंद्र बुंदेले, शोभाताई कानडे, लताताई नेटके, रघुनाथ आंबेडकर, भाऊसाहेब पवार, सुखदेव केदार, प्रतिभाताई धस, गणेश गोरे, पोपट शेटे आदींसह कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here