मतदार जनजागृतीत स्वीप टिव्हीची भूमिका महत्त्वाची-अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी
अहमदनगर :- “भारत निवडणूक आयोगाच्या मतदार जनजागृतीच्या मोहिमांमध्ये सोशल मीडियाचे महत्त्वाचे स्थान आहे.प्रचार व प्रसार माध्यमांमुळे मतदान सजगता वेगाने होण्यास मदत होते. जिल्हा मतदारदूत डॉ.अमोल बागुल यांच्या स्वीप टीव्ही या संकल्पनेच्या माध्यमातून निश्चितच मतदार जनजागृती होण्यास मदत होणार आहे. जागतिक लोकशाही मूल्यांचे दर्शन स्वीप टीव्हीने मतदारांसमोर मांडावे व लोकशाहीचे महत्त्व वृद्धिंगत करावे,” असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडीत जवाहरलाल नेहरु सभागृहात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी मापारी बोलत होते.व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील,उपविभागीय अधिकारी अर्जुन श्रीनिवास, परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी पदमाकर गायकवाड, तहसीलदार उमेश पाटील, चंद्रशेखर शितोळे, परिविक्षाधिन तहसीलदार हेमंत ढोकळे, नायब तहसीलदार अभिजीत बारवकर, प्रशांत गोसावी,मनपा प्रशासनाधिकारी श्रीराम थोरात, विस्तार अधिकारी विनेश लाळगे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या दिशा निर्देशानुसार तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनातून आगामी लोकसभा, विधानसभा ,मनपा , नपा तसेच विविध येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डॉ.बागूल यांच्या स्वीप टीव्ही या यूट्यूब चॅनल व उपक्रमाच्या माध्यमातून मतदारजनजागृती विषयक उपक्रम, संदेश ,व्हिडिओ ,मुलाखती , स्पर्धा ,विविध आदेश , परिपत्रके आदी घटक प्रसारित केले जाणार आहेत.भारत निवडणूक आयोग ,राज्य निवडणूक आयोग ,मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र तसेच जिल्हा निवडणूक शाखा ,अहमदनगर यांच्या वेळोवेळी होणाऱ्या बैठका,अहवाल तसेच पथनाट्य,प्रभातफेरी,लेख,निबंध,घोषवाक्ये, पोस्टर, कविता,प्रदर्शने तसेच आयोगाच्या स्वीप-2 कार्यक्रमांतर्गत मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या ग्रामीण व शहरी भागातील क्षेत्रांमध्ये पथनाटयांचे सादरीकरण,विविध सोहळ्यांचे सूत्रसंचालनातून मतदार जनजागृती,रांगोळी मेहंदी रेखाटनातून जागृती,निवडणूक प्रकियेतील सहभाग,मतदार नावनोंदणी,मतदान नोंदणी,शहरी उदासिनता दूर करणे, मतदारांना लोकशाही प्रक्रियेबद्दल साक्षर करणे,१००% मतदारांची छायाचित्रे संकलित करण्याबाबत जनजागृती,मयत-दुबार-स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्याबाबत आवाहन,दिव्यांग व्यक्ती,महिला,युवक,वंचित समाज समूह,अनिवासी भारतीय व सैन्य दलातील व्यक्तींचा लोकशाही प्रक्रियेत सहभाग वाढवणे,त्याचबरोबर जगभरातील विविध देशातील लोकशाहीप्रधान- निवडणुका – मतदान संकल्पनांची प्रस्तुती देखील या उपक्रमाच्या माध्यमातून केली जाणार आहे.
SVEEP(स्वीप) म्हणजे Systematic Voters’ Education and Electoral Participationचे संक्षिप्त रूप असून त्याचा अर्थ “सुव्यवस्थित मतदार साक्षरता व मतदारांचा मतदान प्रक्रियेतील सकारात्मक सहभाग अभियान “असा होतो.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, प्राध्यापक यांच्यासह शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.