राहुरीत आरपीआयच्या बंदला हिसंक वळण

0

आक्रमक मोर्चेकरांकडून दुकानांची तोडफोड ;व्यापारी तसेच आंदोलकात  चर्चा घटनेवर पडदा टाकण्यात निर्णय.

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

                परभणी तसेच बीड जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ राहुरी बंद दरम्यान शांततेच्या मार्गाने निघालेल्या मोर्चाला गालबोट लागले असून राहुरी शहरातील नवी पेठ येथे काही आंदोलकांनी दोन दुकानांची तोडफोड केल्याची घटना आज दिनांक १८ डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान घडली. यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

         

परभणी तसेच बीड जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज दि. १८ डिसेंबर २०२४ रोजी आरपीआय च्या वतीने राहुरी शहरात बंदचे आवाहन करून निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. या दरम्यान आरपीआय च्या शेकडो कार्यकर्त्यांनी राहुरी बस स्थानक पासून मुक मोर्चाला सुरुवात केली. शहरातील नवीपेठ, पृथ्वी काॅर्नर, आडवी पेठ, शुक्लेश्वर चौक, शिवाजी चौक मार्गे मोर्चा निघून शनीचौक येथे निषेध सभा घेतली.                   मोर्चा पुन्हा नवीपेठ मार्गे बस स्थानककडे जात असताना नवीपेठ येथील काशिद यांचे बापू हलवाई व जेजूरकर यांचे जे जे इलेक्ट्रॉनिक्स हे दोन दुकान चालू होते. यावेळी काही आंदोलकांनी उघड्या असलेल्या दोन दुकानांवर हल्ला करत दुकानांची तोडफोड केल्याची घटना घडली. 

           

आरपीआय तालुकाध्यक्ष विलास साळवे व काही आंदोलकांनी शांततेची भुमिका घेत हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. या घटनेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आरपीआय तालुकाध्यक्ष विलास साळवे, सुनील चांदणे, बाळासाहेब जाधव, सागर साळवे, निलेश शिरसाठ, अरुण साळवे, व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष प्रकाश पारख, देवेंद्र लांबे, सुर्यकांत भूजाडी, सुनील सुराणा, संजीव उदावंत आदिंसह व्यापारी तसेच आंदोलक यांच्यात चर्चा होऊन आरपीआय च्या प्रमुख कार्यकर्त्यांनी दिलगिरी व्यक्त करुन या घटनेवर पडदा टाकला आहे. सायंकाळ पर्यंत राहुरी शहरातील बाजार बंद होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here