देवळाली प्रवरा / प्रतिनिधी,
सोमवार दि. १७ मार्च रोजी राहुरी शहरात शांततेत व मोठ्या उत्साहात शिवरायांची मिरवणूक निघाली होती. रात्री सदर मिरवणूक शिवाजी चौक येथे असताना जून्या भांडणाच्या कारणावरुन काही तरुणांमध्ये शाब्दिक वाद झाला. नंतर काही क्षणातच दोन गटांत तुंबळ हाणामारी होऊन दोन तरुणांवर चाॅपरने वार करण्यात आले. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली.दोन तरुणांना अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची काल दि. १७ मार्च २०२५ रोजी तिथीनुसार असलेली शिवजयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. राहुरी शहरात सायंकाळी चार वाजे दरम्यान शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक निघाली. सदर मिरवणूक रात्री शिवाजी चौक येथे असताना काही तरुणांमध्ये शाब्दिक वाद झाला. नंतर काही क्षणातच दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी ताबडतोब पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन गर्दीला पांगवीले. मात्र काही तरुण ऊर्दू शाळे जवळ गेले. त्या ठिकाणी आठ ते दहा तरुणांनी दोन तरुणांना मारहाण करुन त्यांच्यावर चाॅपरने वाॅर केले. काही तरुणांनी जखमी तरुणांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेले. या घटनेत श्रीकांत काशिनाथ रणसींग व गौरव राजेंद्र रणसींग, दोघे राहणार लोहार गल्ली, राहुरी, हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. तर काही तरुण किरकोळ जखमी झाले आहेत. यावेळी अनेक जणांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. मात्र श्रीकांत रणसींग व गौरव रणसींग हे तरुण गंभीर जखमी असल्याने त्यांना अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही गटाने रात्री गुन्हा दाखल करण्यासाठी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. यावेळी चाचा तनपूरे, सोन्याबापू जगधने, गणेश खैरे, राजेंद्र बोरकर आदिसह काही राजकीय पुढारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी सदर वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. या घटने बाबत पोलिस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
घटने नंतर पोलिस पथकाने रात्री च्या दरम्यान धरपकड करुन अनेक तरुणांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे तरुणांची चांगलीच पळापळ झाल्याचे दिसून आले. सदर तरुणांमध्ये गेल्या दोन तीन महिन्यापासून वाद सुरु होते. आठ दिवसांपूर्वी देखील वाद झाले होते. मात्र त्यांच्या पालकांनी सामंज्यस्या ची भूमिका घेऊन वाद मिटवले होते. मात्र काल शांततेत सुरु असलेल्या शिव जयंती मिरवणूकीत एक मेकांवरची खुन्नस काढून हाणामारी झाली.