देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय कृषि वनशेती संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. बाबासाहेब सिनारे व उद्यानविद्या विभागाच्या सहाय्यक प्राध्यापीका डॉ. सुमती दिघे यांनी माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे शेतकऱ्यांच्या शेतावर जावून मार्गदर्शन केले.
डॉ. बाबासाहेब सिनारे यांनी विविध पिकांच्या उत्पादन वाढीसाठी घ्यावयाची काळजी उदा. पिकांची वेळेवर पेरणी, पाणी व्यवस्थापन, उसाचे पाचट व्यवस्थापन, सुधारीत वाणांचे बियाणे वापर, पीक फेरपालट तसेच बांबू लागवड या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. सुमती दिघे यांनी फळे व भाजीपाल्याचे काढणी पश्चात तंत्रज्ञान याबाबत माहिती दिली. यामध्ये टोमॅटो केचप, कांदा चकत्या, कांदा पावडर, आवळा कँडी इ. तयार करणे बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी उपसरपंच मधुकर गागरे, माजी सरपंच डॉ. रविंद्र गागरे, माजी पोलीस पाटील भाऊसाहेब गागरे, हरिभाऊ लोंढे, बाळासाहेब धोंडे, दिनकर लोंढे, मच्छिंद्र गागरे, रागकिसन गागरे, रंगनाथ लोंढे,अरुण गागरे, प्रभाकर धोंढे, लहाणभाऊ घोरपडे व इतर शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रकल्पाचे लिपीक गणेश बाचकर यांनी सहकार्य केले.