देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील नालकर वस्ती परिसरात बिबट्याच्या दहशतीने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून १ जानेवारी च्या मध्यरात्री बिबट्याने जर्मन शेफर्ड पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्यास ठार केले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून चिंचविहिरे ग्रामपंचायत हद्दीतील सुर्यानगर, गिते नालकर व झांबरे वस्ती परिसरात बिबट्याचे सातत्याने दर्शन होत आहे. या बिबट्याने शेळ्या, कुत्रे व अन्य जनावरांवर हल्ला करून त्यांना फस्त केले आहे. १ जानेवारीच्या मध्यरात्री भूषण दिलीप नालकर यांचे जर्मन शेफर्ड जातीच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यानंतर पाळीव कुत्र्यास नितीन शिंदे यांच्या गिन्नी गवताच्या शेतात नेऊन फस्त केले आहे. सातत्याने पाळीव प्राण्यांवर बिबट्या हल्ला करत असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिक घबराट पसरली आहे. या भागात तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी नालकर, झांबरे व गीते वस्ती परीसरातील नागरीकांनी केली आहे.