राहुरी तालुक्यात बिबट्यांचा दिवसा रात्री वाड्या वस्त्यावर हल्ले

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

               राहुरी तालुक्यात बिबट्यांचा सुळसुळाट झाला असुन हे बिबटे दिवसा रात्री वाड्या वस्त्यावर हल्ले करताना दिसत आहेत. काल दि. २२ जून २०२४ रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास राहुरी कृषी विद्यापीठाच्या इ विभागात राखणीवर असलेले सुरक्षा रक्षक राहुल गायकवाड व राहुल बर्डे हे या क्षेत्रात मोटारसायकलवरून गस्त घालत असताना ९० तळ्याच्या चौफुली भागत अंब्याच्या बागेतुन बिबटयाने मोटारसायकलवर अचानक झेप घेत हल्ला केला.

   याबाबत समजलेली माहिती अशी की,कृषी विद्यापिठाचे सुरक्षा रक्षक गस्त घालीत असताना राहुल गायकवाड व राहुल बर्डे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला.हल्ल्या नंतर मोटारसायकल वरुन ते खाली पडले. यामध्ये दोघेही सुरक्षा रक्षक जखमी झाले. राहुल बर्डे यांनी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांना सदर प्रकार कळवताच शेटे यांनी ताबडतोब गस्तीवर असलेले दत्तु अडसुरे, रवि येनारे व थिटे हे सुरक्षा पर्यवेक्षक गाडी घटना स्थळी पाठवून जखमीना तातडीने राहुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

            उपचार घेऊन परत येत असाताना पुन्हा पाटावर आल्यानंतर दोन बिबट्यांचे दर्शन घडले. वरवंडी मुळानगर शिवारात विबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर होताना दिसुन येतो. त्याच प्रमाणे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने या परिसरात मोठया प्रमाणात बिबट्यांची संख्या दिसुन येत असल्याने सुरक्षा रक्षकांचीच सुरक्षा धोक्यात आल्याचे दिसुन येते.

              सुरक्षा रक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठाचे तात्कालीन कुलसचिव मोहन वाघ यांनि विद्यापीठ प्रक्षेत्रात जागोजागी मचान ( हाईडस् ) उभारणी करण्याचे अश्वासन दिले होते. तसे संबधीत विभागास तशा सुचनाही केल्या होत्या. परंतु संबंधीत विभागाने गांभिर्यान लक्ष न दिल्याने अद्यापही मचान उभी करण्यात आली नाहीत. त्यामुळे सुरक्षा रक्षक आपला जिव मुठीत घरून विद्यापीठाचे रक्षण करीत आहेत.

          भविष्यात ह्या जंगली श्वापदाच्या हाल्यात एखाद्या सुरक्षा रक्षकाचा जिवही जावू शकतो. अशा घटना टाळण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने व वरिष्ठांनी दखल घेणे गरजेचे आहे. जेणे करून सुरक्षा रक्षकाच्या जिवितास धोका होणार नाही. विद्यापीठ प्रक्षेत्रात जागोजागी मचान बसवावे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना कराव्यात. वनविभागाकडून सापळे लावण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सुरक्षा रक्षकांकडुन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here