देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
अज्ञात तीन दरोडेखोरांनी दगडाच्या सहाय्याने घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. आजी व नातवाला कुऱ्हाडीचा धाक दाखवून आजीच्या अंगावरील सुमारे सात ग्रॅम वजनाचे दागीने ओरबाडून काढून घेतले. तसेच सोन्याच्या दागिन्याचा बरोबर एक बोकड घेऊन दरोडेखोर पसार झाले. ही घटना राहुरी तालूक्यातील मुळानगर येथे दिनांक ७ मे रोजी घडली.
रुबीना अहमद शेख, वय ६५ वर्षे, या राहुरी तालूक्यातील मुळानगर येथे त्यांच्या नातवासह राहत आहेत. दिनांक ७ मे रोजी पहाटे १ वाजेच्या दरम्यान अज्ञात तीन चोरट्यांनी रूबीना शेख यांच्या घराचा दरवाजा दगडाच्या सहाय्याने तोडून आत प्रवेश केला. आणि रुबिना शेख यांना म्हणाले की, तु आरडा ओरड केली तर तुला व या मुलाला कुऱ्हाडीने मारुन टाकु. असा दम दिला. त्यानंतर त्यांनी घरातील सामानाची उचकापाचक सुरु करुन पैसे मागीतले. त्यावेळी दरोडेखोरांनी रूबिना शेख यांच्या गळ्यातील मनी, नाकातील मुरनी तसेच कानातील दोन सोन्याची फुले व कुडके असे सुमारे सात ग्रॅम वजनाचे व ४० हजार रूपए किंमतीचे सोन्याचे दागीने जबरदस्तीने ओरबाडून काढुन घेतले. त्यानंतर ते घरातुन बाहेर जात असतांना घराबाहेरील एक पाच हजार रुपए किंमतीचा बोकड असा एकूण ४० हजार रुपए किंमतीचा मुद्देमाल घेवुन पसार झाले.
घटनेनंतर रूबिना अहमद शेख यांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. ४६४/२०२३ भादंवि कलम ३९४, ४५७, ५०६, ३४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.