रेशन दुकानदाराने खाल्ले गरिबांच्या ताटातील शेकडो किलो अन्नधान्य

0

राहता / शिर्डी : शिर्डीमध्ये एका शासकीय स्वस्त धान्य दुकानदाराने गरिबांसाठी आलेल्या गहू तांदळाचा शेकडो किलोचा साठा पुरवठा व इतर महसूलच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरत परस्पर लंपास केल्याचा आरोप शिधा धारकांनी केला आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येक भाषणात , दूरवाहिन्यांवर ८० कोटी जनतेला पुढील पाच वर्षे रेशनवर अन्नधान्य मोफत मिळणार म्हणून जाहिरात करीत असताना दुसरीकडे महसूल मंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या साईबाबाच्या शिर्डीमध्येच पंतप्रधानांच्या या उद्देशाला काळिमा फासण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की शिर्डी येथील स्वस्त धान्य दुकानदाराने गरिबांना वाटण्यासाठी आलेले गहू आणि तांदूळ ग्राहकांचे खोटे ऑनलाईन परवाना दाखवत प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मदतीने परस्पर गायब केले. यातील काही ग्राहक आपले धान्य घेण्यास गेले असता तुम्ही वेळेत न आल्या कारणाने सदर धान्य परत गेल्याचे सांगितले . मात्र ग्राहकांना संशय आल्याने अधिक चौकशी केल्यानंतर या दुकानदाराचे बिंग फुटले. अनेक ग्राहकांचे ऑनलाईन थम परस्पर झाल्याचे दाखवण्यात आले. यात विशेष म्हणजे काही ग्राहक बाहेरगावी गेलेले तर काही रुग्णालयात ऍडमिट असतानाही त्यांच्या नवे धान्य घेतल्याचे समोरच्या आले आहे. ऑनलाईन सिग्नेचर परस्पर स्वस्त धान्य दुकानदार एकटा करू शकत नाही त्याला नक्कीच प्रशासनातील काही झारीतील शुक्राचार्यांनी साथ असल्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे यामागे गरिबांच्या या शिधा लुटारूंची मोठी साखळी असू शकते . याची चौकशी केल्यास मोठा घोटाळा उघडकीस येऊ शकतो . याबाबत या रेशन ग्राहकांनी अन्न पुरवठा मंत्री यांच्याकडे लेखी तक्रार केली असून या तक्रारीत म्हटले आहे की आम्ही शिर्डी येथील स्वस्त धान्य दुकान F.P.S. क्र. १५२२१४३००१४८चे रेशन कार्डधारक असून माहे एप्रिल २०२४ चे सरकारचे वितरणास दिलेले धान्य सदर दुकानचे चालक यांनी राहाता तहसिल अंतर्गत गोदामपाल, पुरवठा निरीक्षक व अहमदनगर जिल्हा पुरवठा निरीक्षक यांचेशी संगनमत करुन माहे एप्रिल २०२४ चे आम्हांला मिळणारे गहू ८४६ किलो व तांदूळ १२५४ किलो हे दिनांक २ मे २०२४ रोजी वरील सर्व शासकिय कर्मचा-यांनी संगनमत करुन आम्ही धान्य नेल्याचे खोटे दस्ताऐवज तयार करुन आमची व शासनाची फसवणूक केली आहे. तरी आपण शासकिय स्तरावर सखोल चौकशी गुन्हेगारांवर कारवाई करून आम्हास न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here