देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
लघुशंकेसाठी बाथरूमला गेला परत येवुन पाहतो तर अज्ञात भामट्याने बुलेट गाडी चोरून धूम ठोकली. ही घटना राहुरी तालूक्यातील गुहा शिवारात राजस्थानी ढाब्या समोर घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मनोज नानासाहेब कदम, वय २९ वर्षे, (रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी.) हा तरूण नातेवाईकांना भेटण्यासाठी चिंचोली येथे त्याच्या एम. एच. १७ सी. सी. १७७३ क्रमांक च्या बुलेट गाडीवर चालला होता. दरम्यान गुहा शिवारातील नगर मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या राजस्थानी ढाब्या समोर रात्री ११ वाजे दरम्यान त्याने बुलेट गाडी उभी करून लघुशंकेला गेला. लघुशंका करुन परत आला असता मोटारसायकल उभी केलेल्या जागी दिसत नव्हती.लघुशंका महाग पडल्याचे तरुणाच्या लक्षात आले. अज्ञात भामट्याने बुलेट गाडी चोरून नेली होती. मनोज कदम या तरूणाने त्याच्या बुलेट गाडीचा आसपास शोध घेतला. परंतु गाडी मिळून आली नाही.
कोणीतरी अज्ञात चोरट्याने बुलेट गाडी चोरुन नेल्याची खात्री झाल्यानंतर मनोज नानासाहेब कदम याने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. ३५७/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघःशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे