लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा तमाशा लोककलेला फटका..: शिवकन्या बढे 

0

पोहेगांव( वार्ताहर ) : सध्या सगळीकडेच लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. आचारसंहिता लागलेली आहे. त्यात गावोगावच्या यात्रा जत्रांचा मौसम आहे. यात्रा जत्रा निमित्ताने गावकरी व आलेल्या पै पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी खास आकर्षण असलेल्या तमाशा लोककलेला आचारसंहितेचा फटका बसत आहे. आणि गावचे कार्यक्रम रद्द झाले आहेत तर अनेक गावकऱ्यांनी आचारसंहितेमुळे कार्यक्रम लवकर उरकावा लागत असल्याने तमाशा कार्यक्रमाची सुपारी कमी केली आहे. असे गेल्या तीन दिवसापासून चांदेकसारे शिवारात कार्यक्रम नसल्याकारणाने मुक्कामी थांबलेल्या हरिभाऊ बढे नगरकर सह शिवकन्या बढे नगरकर लोकनाट्य तमाशा मंडळाच्या संचालिका ढोलकी पट्टू शिवकन्या बढे नगरकर सांगत होत्या.

गेल्या अनेक वर्षापासून तमाशा फड मालक अडचणीत आहेत स्वाईन फ्ल्यू, नोटबंदी, लॉकडाऊन, अवकाळी पाऊस अशा संकटांशी सामना करत तमाशा फड मालक तमाशा कलावंत उभे राहत असतानाच आता लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अनेक कार्यक्रम रद्द झाल्याने पुन्हा एकदा आर्थिक संकटाशी सामना करावा लागत आहे. कार्यक्रम नसला तरी तमाशा फड मालकांना दररोज 70-80 कलावंत सांभाळावेच लागतात. तमाशा कलावंतांना व बिगारी काम करणारे कर्मचाऱ्यांना दररोजचा भत्ता, चहा, नाश्ता, पाणी, जेवण तसेच पैशांची उचल द्यावेच लागते पाच-सहा गाड्यांचा डिझेलचा खर्च आहेच. कमाईची कुठलीही शाश्वती नसताना सावकारी कर्ज काढून उभा केलेला हा एवढा मोठा डौलारा घेऊन महाराष्ट्र भर कमाईच्या आशेने हा तमाशा कलावंत फिरतोच आहे. होळी सणानंतर गावोगावच्या यात्रा जत्रा सुरू होतात आणि हाच तमाशा कलावंतांचा कमाईचा काळ असतो परंतु नेमके याच वेळेस सध्या आचारसंहिता लागलेली असल्याने तमाशा कलावंतांचे आर्थिक भाराने कंबरडे मोडले आहे. स्थानिक पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत, नगरपालिका आचारसंहितेचे कारण सांगून तमाशा कार्यक्रमाला परवानगी देत नाही आणि दिली तरीही खूप काही अटी नियम घालून दिलेल्या असतात त्यामुळे यात्रा कमिटी आणि गावकरी ही डोकेदुखी नकोच म्हणून तमाशाचा कार्यक्रमच रद्द करतात परंतु यानिमित्ताने खरोखरच आदर्श आचारसंहितेचा अभ्यास होणे गरजेचे आहे. केवळ आचारसंहितेचे कारण सांगून गाव गावच्या यात्रा जत्रा आणि तमाशा लोककलेला याचा फटका बसायला नको. वर्षभर यात्रा जत्रा व तमाशाची गावकरी मंडळी  आतुरतेने वाट बघतात त्यांच्या आनंदावर विरजण पडायला नको.

दसरा सणाच्या आसपास तमाशा फड महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघतात. होळी पर्यंत तमाशाचे तिकीटावर कार्यक्रम चालतात परंतु आता  तिकीट काढून येणारा प्रक्षेक राहिला नाही. होळी पासून बुध्द पौर्णिमा पर्यंत गावोगावचे यात्रा कमिटी व गावकरी बिदागी देऊन ओपन कार्यक्रम ठेवतात परंतु आता आचारसंहितेमुळे कार्यक्रमावर परीणाम झाला. नेहमीच अडचणीत असलेल्या तमाशाकडे शासनाचे ही  

दुर्लक्षच आहे. 16 फेब्रुवारी 2024 रोजी शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील लोककलावंतांच्या अनेक पथकांना अनुदान पॅकेज जाहीर झाले त्यात खडी गंमत, संगीत बारी, दशावतार व शाहिरी कलापथके यांना अनुदान जाहीर झाले परंतु यात तमाशा फडांनां डावलण्यात आले. शासनाने सहकार्य न केल्यास महाराष्ट्राची ही लोककला नामशेष होईल.

         अरुण खरात

   ( तमाशा लोककला व लोककलावंत अभ्यासक)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here