लोकांना टोप्या घालणाऱ्या दीपक पटारे यांची पात्रता जनतेला माहीत-अरविंद फोपसे 

0

कोपरगाव : दीपक पटारे यांचे अनेक कारनामे संपूर्ण श्रीरामपूर तालुक्याला माहीत आहेत. त्यांनी लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली आहे. लोकांना टोप्या घालणाऱ्या, ब्लॅकमेल करणाऱ्या व भारतीय संस्कृतीची जाणीव नसणाऱ्या पटारे यांनी विखे पाटलांचे गोडवे गाण्यासाठी गळे काढू नये. युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्यावर टीका करण्याची त्यांची अजिबात पात्रता नाही, अशा शब्दांत अरविंद फोपसे यांनी दीपक पटारे यांना सुनावले आहे. 

दीपक पटारे यांनी कोल्हे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना अरविंद फोपसे यांनी म्हटले आहे की, जगात सर्वश्रेष्ठ असलेल्या भारतीय संस्कृतीचा व रक्ताच्या नात्यांची पटारे यांना जाणीव नाही.दुसऱ्याकडे बोट दाखवण्याआधी त्यांनी आपल्या अंतरंगात किती अन्य गोष्टी दडल्या आहेत हे डोकावून पहावे. ज्यांना आयुष्यात राजकीय स्थिरता साधता येत नाही त्यांनी कोल्हे यांच्यावर टीका करणे हास्यास्पद आहे.

उलट सुलट काम करणारे, लोकांना टोप्या घालणारे अशी प्रतिमा जनतेत चर्चा होते. नोकरी व जमीन मिळवून देण्याचे व बदली करून देण्याचे आमिष दाखवून कुणी अनेकांची फसवणूक केली आहे हे सर्वांना ठाऊक आहे. पटारे यांना कोपरगाव व राहाता तालुक्याच्या राजकारणात नाक खुपसण्याचे काहीच कारण नाही; कारण त्यांची तेवढी पात्रता नाही.परंतु त्यांनी आपल्या नेत्याच्या सांगण्यावरून कोल्हे यांच्यावर निरर्थक टीका करून तोंडसुख घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.बेलगाम बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्यांनी आपले सर्व धंदे जनतेसमोर उघड करण्याची वेळ आणू नये.उगाच वायफळ बडबड करून कुणावरही वाह्यात टीका करू नये अन्यथा त्यांचा ढोंगीपणाचा बुरखा योग्य वेळी टराटरा फाडू हे त्यांनी ध्यानात घ्यावे, असा इशाराही फोपसे यांनी दिला आहे.

विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या विराट जनआक्रोश मोर्चामुळे विखे यांचे धाबे दणाणले आहे. विवेक कोल्हे यांनी त्यांच्या एकहाती वर्चस्वाला सुरुंग लावून त्यांची अकार्यक्षमता चव्हाट्यावर आणल्याने कदाचित विखे अस्वस्थ झाले आहेत. दीपक पटारे यांचे सर्व प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील सगळ्या लोकांना ठाऊक आहेत. समाजात किंमत व विश्वासार्हता नसलेल्या पटारे यांनी सुसंस्कृत नेते विवेक कोल्हे यांच्याबद्दल बोलणे हास्यास्पद आहे. कोल्हे हे एक समंजस नेतृत्व असून, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांचा जनसेवेचा वारसा ते नेटाने पुढे चालवत आहेत. विखे यांच्यासारखा संकुचित दृष्टिकोन न ठेवता व्यापक समाजहिताची भूमिका घेऊन ते राजकारण करतात. शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले असून,जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.गणेश कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी कारखान्याची सत्ता कोल्हे यांच्या ताब्यात देऊन त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे. गणेशनगर परिसरातील जनतेने कोल्हे यांना स्वीकारले आहे. विखे यांच्या अन्यायी कारभाराला, स्वार्थी व दहशतीच्या राजकारणाला राहाता तालुक्यातील जनता पुरती कंटाळली आहे. त्याचा प्रत्यय गणेश साखर कारखाना व ग्रामपंचायत निवडणुकीत आलेला आहे. कोल्हे यांच्या वाढत्या प्रभावामुळे तुमच्या नेत्याला अनेक गोष्टी कराव्या लागत आहेत. कोल्हे यांच्यामुळे तुमच्या नेत्याला शिर्डी मतदारसंघात मोफत साखर वाटावी लागली, यावर्षी उसाल कधी नव्हे तो भाव जाहीर करावा लागला. वैयक्तिक कारणामुळे हतबल झाल्याने तुम्हाला विश्वासार्हता गमावलेल्या निष्क्रिय नेत्याचे गोडवे गात राजकीय टीका-टिपण्णी करावी लागत आहे, असेही फोपसे यांनी म्हटले आहे.   

विखे पाटील यांना कोपरगाव व राहाता तालुक्यात निष्ठावान खांदा मिळत नसल्याने त्यांना आमच्या श्रीरामपूर तालुक्यातून भाडोत्री लोक आयात करावे लागतात. ज्याला समाजात अजिबात किंमत नाही अशा लोकांचा खांदा वापरण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे, असा टोला अरविंद फोपसे यांनी लगावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here