लो.टिळक अंकनाद पाढे सात्मीकरण स्पर्धेत तुळापूर शाळेचे राज्यस्तरीय यश…!

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

         महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकमान्य टिळक अंकनाद पाढेसात्मिकरण स्पर्धा पर्व चौथे यामध्ये जि.प.प्राथमिक शाळा तुळापूर ,ता. राहुरी या शाळेतील दोन विद्यार्थी राज्यस्तरावर चमकले आहेत.

                विराज विवेकानंद खामकर या विद्यार्थ्याने इयत्ता चौथी व पाचवीच्या गटातून महाराष्ट्र राज्यामधून प्रथम क्रमांक मिळवला आहे तर अंश बाबासाहेब वाकचौरे या विद्यार्थ्याने इयत्ता दुसरी व तिसरीच्या गटामधून महाराष्ट्र राज्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. नुकतेच या स्पर्धेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा राष्ट्रीय गणित दिवसाचे औचित्य साधून सावरकर अध्यासन केंद्र पुणे येथे पार पडला. या समारंभासाठी  डॉ. विकास मठे, शास्त्रीय उपकरण विज्ञान विभाग प्रमुख, पुणे विद्यापीठ आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ (निवृत्त) (ए.आरआर.डी.ए) काशिनाथ देवधर आणि दृकश्राव्य माध्यमातून शिक्षण मंत्री दीपक केसरकर  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

             यापूर्वी झालेल्या राज्यस्तरीय पाढे सात्मीकरण स्पर्धेतही या शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्व एक ,पर्व दोन आणि पर्व तीन या तिन्ही पर्वामध्ये असेच यश संपादन करून आपली यशाची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे.

लो.टिळक पाढे सात्मीकरण  स्पर्धेमध्ये महाराष्ट्र भरातून जवळपास २७,००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.स्पर्धेत इयत्ता वार व गटवार ठरवून दिलेले पाढे विचारले जातात.तसेच त्यावर आधारित तोंडी गणितीय उदाहरणांचा समावेश असतो.ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून विद्यार्थ्यांचे परीक्षण केल्या जाते.  त्यामधून प्रथमता जिल्हा पातळीवर अंतिम विजेते ठरवले जातात आणि नंतर राज्य फेरीमधून राज्य पातळीवरील अंतिम विजेत्यांची निवड केली जाते. तुळापूर शाळेतील एकूण 22 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता पैकी जिल्हास्तरीय अंतिम विजेत्यांमध्ये पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती जे राज्यस्तरीय परीक्षणासाठी पात्र ठरले होते. त्यामध्ये इयत्ता पहिली मधून आदिती किरण वाकचौरे , इयत्ता दुसरी- तिसरीच्या गटामधून अंश बाबासाहेब वाकचौरे , समृद्धी अमोल हारदे व अपेक्षा संतोष हारदे तसेच इयत्ता चौथी व पाचवीच्या गटामधून विराज विवेकानंद खामकर अशा पाच विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय परीक्षण फेरीसाठी निवड करण्यात आली होती. राज्यस्तरीय परीक्षणासाठी पात्र विद्यार्थ्यांची ऑनलाईन मुलाखत घेण्यात आली. ज्यामध्ये त्यांची पाढे पाठांतर क्षमता ,पाढ्यांवर आधारित गणितीय प्रश्नांची उत्तरे देण्यातील अचूकता व वेग या सर्व बाबींचा साकल्ल्याने विचार करून महाराष्ट्रभरातून सहभागी विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाते. जिल्हा व राज्य या दोन्ही फेरिंमधून तुळापूर शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे . या यशामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या जि.प.शाळेचे नाव तालुका ,जिल्हाच नव्हे तर राज्यस्तरावर उंचावले आहे.

राज्यस्तरीय प्रथम व द्वितीय क्रमांकांच्या विजेत्यांना  मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि अनुक्रमे ११,००० ,व ७००० रुपयांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे देण्यात आली.

                    यशाबद्दल विद्यार्थ्यांचे तसेच मुख्याध्यापक जगन्नाथ भांगरे व वर्गशिक्षक विवेकानंद खामकर यांचे तुळापूर ग्रामस्थ , शाळा व्यवस्थापन समिती ,माता पालक व शिक्षक पालक संघ तसेच गटशिक्षणाधिकारी  अर्जुनराव गारुडकर , विस्तार अधिकारी काकडे मॅडम ,केंद्रप्रमुख ठोंबरे मॅडम व शैक्षणिक वर्तुळांतून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here