वंचित शेतकऱ्यांना ‘पीएम किसान’ योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष मोहीम-स्नेहलताताई कोल्हे 

0

कोपरगाव : ई-केवायसी व इतर कारणांमुळे प्रधानमंत्री किसान (पीएम किसान) सन्मान निधी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने ६ डिसेंबर २०२३ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत गावपातळीवर ४५ दिवसांची विशेष मोहीम हाती घेतली आहे. पात्र शेतकऱ्यांना ‘पीएम किसान’ योजनेत समाविष्ट करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे, अशी माहिती माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे Snehlatatai Kolhe यांनी दिली. या योजनेपासून वंचित राहिलेल्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

विविध कारणांमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान (पीएम किसान) सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारमार्फत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा २ हजार रुपयांप्रमाणे दरवर्षी एकूण ६ हजार रुपये दिले जातात. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना सुरू केली असून, या दोन्ही योजनांतून शेतकऱ्यांना आता दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत. ही रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा मोठा फायदा होत असल्याचे सांगून स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, राज्यातील सुमारे १२ लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेपासून वंचित होते. राज्य सरकारने गेल्या ऑगस्ट महिन्यात राज्यभरात विशेष मोहीम राबवून ६ लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत वाढविले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १६ व्या हप्त्याचे वितरण जानेवारी महिन्याच्या शेवटी करण्यात येणार आहे. अजूनही अनेक शेतकरी जमिनीचा तपशील अद्ययावत न केल्याने तसेच बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केल्यामुळे ‘पीएम किसान’ योजनेपासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांना ‘पीएम किसान’ योजनेत सामावून घेऊन लाभ मिळवून देण्यासाठी सरकारने ६ डिसेंबरपासून गावपातळीवर विशेष मोहीम सुरू केली असून, १५ जानेवारी २०२४ पर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेत लाभार्थी शेतकऱ्यांची योजनेतील सद्य:स्थिती तपासणे, ई-केवायसी करणे, पोर्टलवर नोंदणी करताना जमिनीचा तपशील भरणे, चेहरा ओळखणाऱ्या फेस ऑथेंटिफिकेशनचा वापर करून ई-केवायसी करणे यासाठी गाव पातळीवरील अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना मदत करणार आहेत. यासोबत लाभार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केले असल्याची खातरजमा ते करणार आहेत. पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन योजनेच्या निकषांनुसार तपासणी व सर्व त्रुटी दूर करून पात्र शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना योजनेत समाविष्ट करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘पीएम किसान’ योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने त्रुटी दूर करून आवश्यक बाबींची पूर्तता करावी. याबाबत कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हे यांनी केले आहे. महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी ‘पीएम किसान’ योजनेचा लाभ मिळत नसलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या त्रुटी दूर करून त्यांना लाभ मिळण्यासाठी योग्य कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here