मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. विरोधक सत्त्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. अशातच काल वर्ध्यात एका कार्यक्रमात बोलत असताना भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली होता. त्यावरच आता अमोल कोल्हे यांनी नितेश राणे यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
अमोल कोल्हे म्हणाले, “वडिलांच्या कर्तृत्वावर पोळ्या भाजणाऱ्यांनी विचार करुन बोलावे. कारण बोलताना असताना त्यांचे संस्कार प्रकट होतात. महाराष्ट्रातील राजकारणाला सुसंस्कृतपणाचा आदर्श आहे. माईकवरच बोलायचे असेल तर मला ही बोलता येतं. पण इतिहास मांडण्यासाठी मी राजकारण आणत नाही.”
त्याचबरोबर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या लोकांनी जास्त बोलू नये. अशा शब्दात अमोल कोल्हेंनी नितेश राणे यांना चांगलंच सुनावलं आहे. यावर आता नितेश राणे (Nitesh Rane) काय उत्तर देतात का? हे पाहावं लागणार आहे.
नितेश राणेंचं वक्तव्य काय?
वर्धा दौऱ्यावर असताना भाजप नेते नितेश राणे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला. “अमोल कोल्हे कुठे भेटू दे त्याला दाखवतोच.” अशा शब्दात नितेश राणेंनी त्यांच्यावर टीका केली. पुढे बोलताना ते म्हणाले, “कुठला तो अमोल कोल्हे नावाचा ॲक्टर. शिवाजी महाराजांचे रोल पैसे घेऊन करतो. तो काही फुकट काम करत नाही. तो फक्त नावासाठी खासदार झाला आहे. त्याने जर दाढी काढली तर त्याला कोणी ओळखणार पण नाही. तो फक्त सिरीयल पुरताच मर्यादित आहे.”