कोपरगाव:- “कोणताही महामानव हा त्या काळाचे अपत्य असतो व तो त्या काळातील प्रश्न सोडवण्याचे कार्य करतो. १९ व्या शतकात असे कार्य करून तत्कालीन प्रश्न सोडविण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण, हे देण्याचे काम महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या महामानवांनी केले. म्हणूनच आज आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत. त्यांनी दिलेल्या शिक्षणातून वर्तन सुधारणे आणि त्यातून परिवर्तन घडणे म्हणजे शिक्षण होय. शिक्षणात उत्तीर्ण होणे व त्यानुरूप वर्तन घडणे अपेक्षित असते. उत्तीर्ण व वर्तन यातील सुसंगतीच व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू ठळक करते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला असे पैलू पाडणारे संस्कार करण्यासाठी शिक्षण संस्थांमधून महामानवांचे जयंती कार्यक्रम संपन्न होतात. असे कार्यक्रम करतानाच आपले प्रेरणा व आदर्श निश्चित होण्याची गरज आहे”. असे प्रतिपादन पुणे येथील डॉ.धनंजय भिसे यांनी केले.
येथील एस.एस.जी.एम.महाविद्यालयात नुकतीच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉ.भिसे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुर येथील मनोहरराव देशमुख
महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. द. के. गंधारे हे होते. अध्यक्षीय भाष्य करताना त्यांनी सांगितले की, आपले पूर्वज हे अविद्येचे बळी होते. त्या पार्श्वभूमीवर आपण भाग्यवान आहोत,कारण आपणाला शिक्षणाच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेल्या आहेत.मात्र या शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांनी स्वतः बरोबर समाजासाठी करावा. त्यासाठी सक्षम व्हावे. स्वयंपूर्ण व्हावे.दुसऱ्याला मोठे म्हणण्याची वृत्ती आपल्या मनी जोपासली गेली पाहिजे. हे करणे म्हणजे खऱ्याअर्थाने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करून, त्यांना अभिवादन करणे होय.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा.उज्ज्वला भोर यांनी केले. कार्यक्रमामागील भूमिका कथन करताना त्यांनी सांगितले की, प्रतिमा व व्यक्ती पूजा म्हणजे जयंती साजरी करणे नाही; तर व्यक्तीचा विचार घेऊन प्रतिमा
मनात ठसवून परिवर्तन साधणे म्हणजेच खऱ्या अर्थाने जयंती साजरी करणे होय.
याप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. तर प्रा.छाया शिंदे यांनी सावित्रीबाईवरील आपल्या कवितांचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. वैशाली सुपेकर यांनी केले.आणि
उपस्थितितांप्रती प्रा. डॉ. सीमा चव्हाण यांनी आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक,सर्वशिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.