पाच दिवसांनी येणाऱ्या आवर्तनानंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराला सुरु असलेला नियमित पाणीपुरवठा सुरु राहावा यासाठी २७ डिसेंबरला आवर्तन सोडल जाणार आहे त्याबाबतच्या सूचना आ. आशुतोष काळे यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत. हि खबर विरोधकांच्या कानावर पडताच विरोधकांनी श्रेय घेण्यासाठी आंदोलन केले असून विरोधकांनी पिण्याच्या पाण्याबाबत राजकारण करू नये असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले यांनी म्हटले आहे.
कोपरगाव शहरातील नागरिकांना केला जाणारा पाणी पुरवठा कोपरगाव नगरपरिषदेने सहा दिवसांनी केला आहे हा बदल तात्पुरता आहे याची नागरिकांना कल्पना आहे. व कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी चंग बांधलेला असून त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला १३१.२४ कोटीची पाणी योजना मंजूर करून आणली असून या योजनेतील अतिशय महत्वाच्या असलेल्या ५ नंबर साठवण तलावाचे काम प्रगतीपथावर आहे. काही महिन्यात काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना नियमित स्वच्छ पाणी पुरवठा होणार आहे त्यामुळे नागरिकांना चिंता नाही. मात्र याची धास्ती विरोधकांना वाटत असून त्यांच्या पोटात राहून राहून दुखत असल्यामुळे विरोधक हतबल झाले आहेत. त्यामुळे कुठेतरी नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी कोल्हे गट आंदोलनातून पिण्याच्या पाण्याच्या जिव्हाळयाच्या प्रश्नावरून राजकारण करीत आहे. विरोधकांनी सत्तेत असतांना नागरिकांना १६ तर कधी २१ दिवसांनी पाणी पुरवठा करून नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकायला लावले याचा त्यांना विसर पडलेला दिसतो.
गोदावरी कालव्यांचे आयुर्मान १०० वर्षापेक्षा जास्त झाल्यामुळे हे कालवे वारंवार फुटून पाण्याचा अपव्यय होत होता व आवर्तनात देखील अडथळा निर्माण होवून त्याचा परिणाम सिंचनावर व पाणी पुरवठा योजनांवर होत होता. याची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी निवडून येताच गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ३०० कोटीचा निधी मंजूर करून घेतला आहे. त्या माध्यमातून कालव्यांची दुरुस्ती सुरु असुन हि कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करावे जेणेकरून सिंचन व पाणी पुरवठा योजनांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार याची पाटबंधारे विभागाने काळजी घ्यावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी आज (दि.२२) रोजी पार पडलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली असता त्या मागणीची पालकमंत्र्यांनी देखील दखल घेतली आहे. कोपरगाव शहराला आवश्यक असणारा पाणी साठा आरक्षित आहे. मात्र साठवण क्षमता नसल्यामुळे नागरिकांना नियमित पाणी मिळत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी ५ नंबर साठवण तलावाचे काम सुरु करण्याबरोबरच उर्वरित चारही तलावांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. व कोपरगाव शहरात चार नवीन जलकुंभ व वितरण व्यवस्थेच्या पाईप लाईनचे काम प्रगतीपथावर असून भविष्यात वाढती लोकसंख्या लक्षात घेवून वाढीव पाणीसाठा देखील त्यांनी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे नागरिकांची तहान कायमची भागणार असून नागरिक बिनधास्त आहेत.
आ. आशुतोष काळेंनी आणलेली १३१.२४ कोटीची योजना लवकरच पूर्ण होवून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे त्यामुळे आपले अस्तित्व संपण्याची भीती विरोधकांच्या मनात घर करून राहिली आहे. त्यामुळे चुकीच्या बातम्या पसरवून या योजनेत खोडा घालण्याचा विरोधकांचा अजूनही प्रयत्न सुरूच असून त्यात यश मिळत नसल्यामुळे नागरिकांच्या मनात कुठतरी संभ्रम निर्माण करायचा या उद्देशातून विरोधक आंदोलन करीत आहे. ज्यांनी नागरिकांना १६ दिवस,२१ दिवसांनी पाणी पुरवठा केला त्यांनी अशा जिव्हाळ्याच्या प्रश्नावर केलेले आंदोलन हास्यास्पद असल्याचे सुनिल गंगुले यांनी शेवटी म्हटले आहे.