संगमनेर : काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये निळवंडे कालव्यांसह तालुक्याच्या विकास कामांसाठी मोठा निधी मिळवला होता. मागील वर्षीही अंगणवाडी, प्राथमिक शाळा खोल्या, विविध रस्ते यांसह विविध कामांच्या केलेल्या मागणीतून व पाठपुराव्यातून जिल्हा विकास नियोजन मधून या कामांना ६ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत थोरात म्हणाले की, सातत्याने विकासातून वाटचाल करणाऱ्या संगमनेर तालुक्याच्या प्रत्येक गावासाठी आमदार थोरात यांनी मोठा निधी मिळवला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी मोठा निधी मिळवुन ही कामे रात्रंदिवस सुरू ठेवली होती. याचबरोबर तालुक्यातील रस्ते, अंगणवाडी, प्राथमिक शाळा खोल्या व विविध विकास कामांसाठी ही मोठ्या निधीची मागणी केली होती. मात्र सत्ता बदल झाला आणि अनेक विकास कामांना स्थगिती मिळाली होती. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सुचवलेल्या व पाठपुरावा केलेल्या विविध विकास कामांना जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली असून या अंतर्गत संगमनेर तालुक्यातील अंगणवाडीच्या चार खोल्यांसाठी ४५ लाख रुपये, जनसुविधा योजनेअंतर्गत पेविंग ब्लॉक बसवणे, दशक्रिया विधी घाटाचे सुशोभीकरण ,पिण्याच्या पाण्याचे फिल्टर बसवणे, सोलर लॅम्प बसवणे व इतर सुशोभीकरण कामासाठी ५६ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. तर प्राथमिक शाळेच्या ८ खोल्यांसाठी १ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. याचबरोबर नागरी सुविधांमधून चंदनापुरी येथील साईबाबा मंदिर परिसर स्वच्छतागृह अनुग्रह बांधण्यासाठी १२ लाख रुपये, साकुर येथील सार्वजनिक ठिकाणी दिवाबत्ती करण्यासाठी ७ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. याचबरोबर क वर्ग तीर्थक्षेत्रांकरीता १ कोटी ५ लाख रुपये आणि संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण कामांसाठी ३ कोटी १० लाख रुपयांचा निधी असे एकूण ६ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.विविध गावांमध्ये होणाऱ्या या विकास कामांच्या निधी करता आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये कौठे धांदरफळ, वेल्हाळे, पिंपळगाव माथा ,निळवंडे येथे अंगणवाडी खोल्या उभारण्यात येणार आहेत. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्या जांभुळवाडी,तळेगाव, शेळकेवाडी,कसबावाडी, पोखरी हवेली, साकुर आणि राजापूर येथे बांधण्यात येणार आहे. याचबरोबर जनसुविधा योजनेअंतर्गत मेंगाळवाडी, निमगाव खुर्द, सावरगाव तळ, निमोण, निळवंडे, चिंचोली गुरव, आंबी खालसा,सावरगाव घुले, पोखरी बाळेश्वर, जवळे बाळेश्वर, वडगाव लांडगा,चिकणी, गुंजाळवाडी,वेल्हाळे,कसारा दुमाला, डोळासने, खंडेरायवाडी, या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात येणार आहे. रस्ते डांबरीकरण व मजबुतीकरणासह विविध कामांचा समावेश असलेली ही कामे लवकरात लवकर सुरू होणार असल्याची माहिती इंद्रजीत थोरात यांनी दिली.आमदार बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा केलेली कामे लवकर सुरू होणार असल्याने संगमनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.