कोपरगाव : कोपरगाव शहरातील कायदा-सुव्यस्था धोक्यात येऊ नये,सर्वधर्मीय सलोखा कायम रहावा,राजकीय पक्ष-संघटना यांत समन्वय राखण्यासाठी एक-दोन महिन्यातून एकदा तरी शांतता समितीची बैठक घेण्यात यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली आहे.
वहाडणे यांनी पुढे म्हटले आहे की हिंदूंचा सण-उत्सव असल्यावर फक्त काही हिंदु व मुस्लिमांचा सण-उत्सव असल्यास केवळ काही मुस्लिमांना बोलावून मिटिंग घेणे योग्य नाही. महत्वाचे सण-उत्सव सार्वजनिकरित्या साजरे करायचे असल्यास सर्वधर्मीय -सर्वपक्षीय महत्वाचे नेते-कार्यकर्ते यांचा समावेश असलेल्या शांतता समितीची संयुक्त मिटिंग घेतली पाहिजे. वरचेवर एकत्र आल्याने-एकमेकांत समन्वय राहिल्याने समाजात एकोपा टिकून राहील . तसेच समाजात असलेल्या अपप्रवृत्ती व समाजकंटकावर वचक बसून शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राहू शकते.त्यामुळेच राजकीय व धार्मिक तणावही आपोआपच कमी होईल. अशा बैठका घेतल्याने प्रशासनास मोलाचे सहकार्य होईल यात शंकाच नाही.
वर्षभरात सर्वच धर्मांचे अनेक सण-उत्सव असतातच.आपण लवकरात लवकर शांतता समिती गठीत करून बैठका घ्यायला सुरुवात केली पाहिजे.मात्र या समितीत गुन्हेगारीमुळे हद्दपारी भोगलेले गुंड -अवैध व्यवसाय करणारे यांना थारा देऊ नये. असे आवाहनही वहाडणे यांनी आपल्या निवेदनात केले आहे.